नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा-पूर्व परीक्षा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांची ऑनलाईन परीक्षा ४ सप्टेंबरला एकाच दिवशी होणार आहे. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची परीक्षा दुसऱ्या दिवशी घेणे अपेक्षित होते. मात्र, केवळ परीक्षेसाठीची वेळ वाढवून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करताना विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडणार आहे.
अडीच वर्षांनी आयोगाकडून ही परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी होत होती. मात्र, विद्यापीठाने परीक्षा रद्द न करता याच दिवशी परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. केवळ जे विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती एमपीएससी परीक्षेच्या प्रवेशपत्रासह आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत परीक्षा विभागाला कळवावी. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांना ४ सप्टेंबरच्या विद्यापीठाच्या परीक्षेसाठी अतिरिक्त कालावधी देण्यात येईल, असे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. विद्यापीठाच्या या भूमिकेमुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.