एप्रिलचा पाऊस लाभदायक : व्याघ्र गणनेचा अहवाल लवकरचअमरावती : यावर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या पावसाने जंगल, रानावनात सर्वत्र हिरवळ कायम होती. परिणामी तृणभक्षी प्राण्यांना चारा मिळाला तर जंगलात आगी लागण्याच्या घटनाही नगण्य घडल्यात. ही बाब वाघांसाठी पोषक ठरल्याने विदर्भात वाघांची संख्या वाढण्याची दाट शक्यता वनअधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.विदर्भात मेळघाट, पेंच-ताडोबा या व्याघ्र प्रकल्पांसह नागझिरा-बोर, टिपेश्वर अभयारण्यात वाघ असल्याची नोंद आहे. मे महिन्यात डेहरादून येथील वाईल्ड लाईफ संस्थेतर्फे मेळघाट व पेंच-ताडोबा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र गणना करण्यात आली. मात्र या गणनेचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसला तरी एकूण घडामोडींच्या आधारे मागील व्याघ्र गणनेच्या तुलनेत यंदाच्या गणनेत वाघांची संख्या निश्चित वाढेल, असा दावा वनअधिकारी करु लागले आहेत. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात जंगलाला आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. परंतु यंदा मेळघाट आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आगीच्या घटना अत्यल्प घडल्या आहेत. वन्यप्राणी होरपळून मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे कमी झाली आहेत. अशातच एप्रिलमध्ये पाऊस आल्याने जंगलात हिरवळ कायम होती. यावर्षी पावसाळा लांबला तरी जंगलात तृणभक्षी प्राण्यांना चाऱ्यासाठी फार भटकंती करावी लागली नाही. तेंदूपत्ता तोडीचा मोसम यावर्षी दीर्घकाळ चालला नाही. परिणामी एप्रिल महिन्यात आलेल्या पावसाने हिरवळ कायम ठेवली. ही हिरवळ पावसाळा सुरु होईपर्यत व्याघ्र प्रकल्पात पाहावयास मिळाली. त्यामुळे वाघांचे भक्ष्य असलेल्या तृणभक्षी प्राण्यांना जंगलात चारा उपलब्ध झाला. यापूर्वी वाघांच्या शिकारीच्या घटना लक्षात घेता वनविभागाने एप्रिल महिन्यापासूनच शिकाऱ्यांवर पाळत ठेवली होती. परिणामी विदर्भात वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्याचे ऐकू आले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
विदर्भात वाघांची संख्या वाढण्याची दाट शक्यता
By admin | Published: July 25, 2014 12:44 AM