लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मंगल कार्यालयांना गर्दी न करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोजकांना लग्न समारंभ रद्द करणे किंवा पुढे ढकलण्याची विनंती आयोजकांना करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयसुद्धा बंद करण्यात आले आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सह दुय्यम निबंधक कार्यालय तथा विवाह नोंदणी कार्यालयाची परिस्थिती मात्र वेगळीच आहे. येथे दररोज सरासरी १० विवाह होत आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. यासोबतच विवाहाची तारीख घेण्यासाठीही लोक येताहेत.लोकमत चमू शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली. सर्वत्र सामसूम होती. परंतु विवाह नोंदणी व निबंधक कार्यालयात मात्र चांगलीच वर्दळ होती. कार्यालयाच्या बोर्डवरच दोन मोठे हार टांगलेले होते, ज्यामुळे सर्व चित्र स्पष्ट होत होते. माहिती घेतली तेव्हा सांगण्यात आले की, येथे नेहमीप्रमाणे काम सुरू आहे. शुक्रवारी येथे दुपारी २ वाजेपर्यंत १० लग्न झाले होते. लग्नासाठी कमीत कमी पाच लोकांची उपस्थिती आवश्यक आहे. यात वर-वधू, दोन्ही पक्षांकडून एकेक साक्षीदार आणि एक वकील यांचा समावेश असतो. या पाच लोकांना कार्यालयाच्या आत दुय्यम निबंधकासमोर उपस्थित राहावे लागते. त्यांच्यासोबत इतर कुटुंबीय व नातेवाईकही येतात. परंतु त्यांना बाहेर गेटजवळच वाट पाहावी लागते. याशिवाय १० जोडपी लग्नाची तारीख घ्यायलाही येतात. प्रत्येक जोडप्यासोबत साक्षीदार उपस्थित असल्यास त्यांना तारीख दिली जाते. हे काम निरंतर सुरू होते.येथे मुख्यत: प्रेमविवाह करणारे लोक येतात. काहींना वारेमाप खर्च न करता साध्या पद्धतीने लग्न करण्याची इच्छा असते. तेही येथे लग्न करण्यास येतात. या प्रकारे कार्यालयात दस्तऐवज नोंदणीचे कामही निरंतर सुरू होते. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या फोटोसह बायोमेट्रिक मशीनवर अंगठ्याचे ठसेही घेतले जात होते. एकीकडे कोराना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करण्यात आली, रेशन दुकानातील बायोमेट्रिक पद्धत बंद झाली आणि दुसरीकडे या विभागात हा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले.
नागपुरातील रजिस्टर 'मॅरेज'साठी उसळतेय गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:26 AM
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सह दुय्यम निबंधक कार्यालय तथा विवाह नोंदणी कार्यालयात दररोज सरासरी १० विवाह होत आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. यासोबतच विवाहाची तारीख घेण्यासाठीही लोक येताहेत.
ठळक मुद्देविवाह नोंदणी कार्यालयातील स्थिती : रोज १० लग्न, १० निवेदन, बायोमेट्रीकद्वारे ठसे