नागपूर : कोरोनामुळे शाळांवर चांगलाच आघात झाला. सलग दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणारी पाठ्यपुस्तके व गणवेशाच्या बाबतीत नियोजनाची धडपड होताना दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गणवेशाबद्दल शिक्षण विभागाला अद्याप कुठल्याही सूचना नाही. पाठ्यपुस्तकाच्या बाबतीतही जी शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेशाळेत पोहचायची त्याचा सुद्धा अजूनही पुरवठा झालेला नाही. कोरोनामुळे शाळेच बंद असल्याने शासनानेही याबाबत ढिलाईची भूमिका घेतलेली दिसते आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प. शाळेमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीचे एससी, एसटी, बीपीएल प्रवर्गाचे विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना मोफत गणवेश दिल्या जाते. परंतु यंदा शाळा होऊन दोन आठवड्याहून अधिक कालावधी लोटला असतानाही शासनाकडून गणवेशाबाबत कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी कोरोना प्रादुभार्वामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका गणवेशासाठी ३०० रुपयाप्रमाणे ६४ हजार विद्यार्थ्यांकरिता २.८९ कोटीचा निधी केंद्राकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाला होता. परंतु यंदा शासनाकडून शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतची कुठलीही माहिती अथवा लागणाऱ्या निधीबाबतची विचारणाच झाली नाही.
जिल्हा परिषद, महापालिका व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. नवीन सत्राकरीता वर्ग पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ४९ हजारावर विद्यार्थ्यांकरिता जि.प.च्या शिक्षण विभागाकडून ८ लाख २ हजाराहून अधिक पुस्तकांची डिमांड बालभारतीकडे गेल्या अनेक दिवसांपूर्वीच केली आहे. दरवर्षी बालभारतीकडून साधारणत: मे महिन्यात पुस्तकांची छपाई होऊन केंद्र शाळांवर पोहचविली जाते. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात येते. परंतु यंदा शाळा सुरू होऊन पंधरवडा लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले नाही.
- जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर, नरखेड, सावनेर तालुक्यात पुस्तकांच्या मागणीच्या तुलनेत ७० टक्के पुरवठा झाला आहे. एक दोन दिवसात नागपूर व हिंगणा तालुक्यातही पुस्तकांचा पुरवठा होईल. गणवेशाच्या बाबतीत शासन यु-डायसनुसार गणवेशाचा निधी वितरित करते. लवकरच गणवेशाच्या बाबतीत सूचना, आदेश येतील. आम्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळानिहाय विद्यार्थ्यांची यादी मागितली आहे.
- प्रमोद वानखेडे, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान, जि.प.नागपूर