पेशंट, नातेवाईकांच्या व्यवस्थेसाठी मुहूर्त शोधताय का? न्यायालयाची अवमानना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 09:24 PM2021-05-04T21:24:40+5:302021-05-04T21:27:56+5:30
Corona Virus, High court शासकीय रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना साेय हाेईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले हाेते. मात्र दहा-बारा दिवस लाेटूनही अशाप्रकारची कुठलीही व्यवस्था शहर, जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुहूर्त शाेधताय का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना साेय हाेईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले हाेते. मात्र दहा-बारा दिवस लाेटूनही अशाप्रकारची कुठलीही व्यवस्था शहर, जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुहूर्त शाेधताय का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
काेराेना महामारीच्या प्रकाेपाने उग्र रूप धारण केले आहे. मेडिकल, मेयाे आणि नव्याने तयार झालेल्या एम्स या शासकीय रुग्णालयांमध्ये दरराेज माेठ्या संख्येने रुग्ण दाखल हाेत आहेत. मात्र या शासकीय रुग्णालयांमध्ये आधीच उपचारार्थ असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने भरती हाेण्यास आलेल्या रुग्ण व साेबत आलेल्या नातेवाईकांना तासनतास ताटकळत बसावे लागते. याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली हाेती. यामध्ये सहभागी असलेले जाेसेफ जाॅर्ज यांनी सांगितले, मेयाे, मेडिकल यासारख्या रुग्णालयांमध्ये दरराेज शेकडाे रुग्ण भरती हाेण्यासाठी येत असतात. मात्र रुग्णालयांची प्रतीक्षा यादी २५-३० वर असते. त्यामुळे नव्याने आलेल्यांना ५-६ तर कधी ८-८ तास प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी या रुग्णांना रुग्णालयाबाहेर कुठेही झाडाच्या आडाेशाला किंवा उन्हात ताटकळत बसावे लागते. साेबत आलेले नातेवाईक आणि रुग्णवाहिकासुद्धा खाेळंबली असते. अशावेळी रुग्णांना शांतपणे बसता यावे, यासाठी व्यवस्था हाेणे आवश्यक आहे.
न्यायालयाने याबाबत शासकीय रुग्णालय व जिल्हा प्रशासनाला रुग्णालय परिसरात व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. रुग्णालयासमाेर माेठा पेंडॉल उभारण्यात यावा, या ठिकाणी खुर्च्या, पंखे आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या हाेत्या. मात्र एकाही रुग्णालयात दिलेल्या निर्देशानुसार व्यवस्था करण्यात आल्याचे दिसत नाही. मेडिकलमध्ये पेंडाॅल टाकण्यात आला पण इतर सुविधा पुरविण्यात आली नाही. मेयाे रुग्णालयात छाेटासा मंडप टाकण्यात आला. एम्समध्ये ही व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ताटकळणारे रुग्ण व चिंतातुर नातेवाईकांना कुठलाच दिलासा मिळताना दिसत नाही.