नागपूर : बलात्काराची तक्रार करणारी एक मुलगी बुधवारी आरोपीला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे सैरभैर झाली व तिने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठ परिसरामध्ये जोरजोरात ओरडत गोंधळ घातला. दरम्यान, जबाबदार अधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न करूनही ती शांत झाली नाही. परिणामी, तिला पकडून सदर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर तिला समजावून घरी सोडून देण्यात आले.
अश्विन सहदेव चिंचुलकर, असे आरोपीचे नाव असून तो दाभा येथील रहिवासी आहे. संबंधित मुलीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी १९ मार्च २०२४ रोजी या आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(एन), ५०६ व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविला आहे. तक्रारीनुसार, ऑगस्ट-२०२३ मध्ये या मुलीची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने कोणत्याना कोणत्या कारणावरून मुलीसाेबत वारंवार संपर्क साधून मैत्री वाढविली. दरम्यान, त्याने एका हॉटेलमध्ये मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. पुढे, त्याने बदनामी करण्याची धमकी देऊन या कुकृत्याची वारंवार पुनरावृत्ती केली. त्याने मुलीला लग्न करण्याचे वचनही दिले होते. कालांतराने तो मुलीला टाळायला लागला, असा आरोप आहे. सत्र न्यायालयाने ६ एप्रिल २०२४ रोजी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्या अपीलवर बुधवारी न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यांनी विविध बाबी लक्षात घेता आरोपीला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. हा निर्णय तक्रारकर्त्या मुलीला आवडला नाही व ती गोंधळ घालायला लागली.