लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : उमरेड ते कुही (माहुर्ली) पॅकेज-३ अंतर्गत नागपूर-नागभीड ब्राॅडगेज रेल्वेचे काम सुरू आहे. या अनुषंगाने काही शेतकऱ्यांच्या वाढीव शेतजमिनीवर संबंधित कंत्राटदाराने खोदकाम केले. मातीकाम, मुरुमकाम सुरू आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पात गेल्यात त्यांना त्यांचा मोबदला मिळाला. वाढीव शेतजमिनीचा गुंता कायम आहे. आम्हाला नोटीसही दिल्या गेल्या नाहीत. काम सुरू केले आणि मोबदलाही मिळाला नाही, असा आरोप उमरेड तालुक्यातील बाह्मणी (कुंभापूर) येथील शेतकऱ्यांचा आहे.
सध्या बाह्मणी (कुंभापूर) परिसरात रेल्वेचे मातीकाम सुरू आहे. यामध्ये वासुदेव चिलमकर, श्रावण वाढई, नाना लुटे, संजय लुटे यांची वाढीव शेतजमीन गेली असून, आम्हास तातडीने मोबदला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासन, तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीकडे पत्रव्यवहारही केला आहे. बाह्मणी (कुंभापूर) या परिसरातून नागपूर-नागभीड रेल्वे धावणार आहे. पूर्वी या संपूर्ण प्रवासात बाह्मणी रेल्वे स्टेशन अतिशय महत्त्वपूर्ण होते. याच कारणाने भविष्यात या ठिकाणी रेल्वे स्टेशनची निर्मितीही होईल.
नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वेचे चार वेगवेगळ्या टप्प्यात काम सुरू आहे. यामध्ये नागभीड ते भिवापूर, भिवापूर ते उमरेड, उमरेड ते कुही (माहुर्ली) आणि कुही ते नागपूर असे चार पॅकेज आहेत. साधारणत: ३० किलोमीटरच्या अंतरावर टप्प्याटप्प्याने हे काम सुरू असून, चार कंपन्यांकडे याबाबतचे कंत्राट सोपविण्यात आले आहे. उमरेड ते कुही (माहुर्ली) या पॅकेजमध्ये पी.व्यंकटा रमण्णा इंजिनीअरिंग ॲण्ड काॅन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट मिळाले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी, तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, वाढीव शेतजमिनीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मोजणी झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल, असे उत्तर दिले. प्रक्रियेपूर्वीच आमची शेतजमीन का घेतली, असा सवाल संजय लुटे यांनी उपस्थित केला आहे. तातडीने समस्या सोडवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
....
शेतात माती, शेतकऱ्यांवर भुर्दंड
बाह्मणी (कुंभापूर) परिसरात रेल्वेचे काम सुरू असताना, रेल्वे रूळ आणि अवतीभवती असलेली माती काही शेतकऱ्यांच्या शेतात संबंधित कंत्राटदाराने टाकली. खोदकाम केलेली ही माती शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्यानंतर, समतल करण्याचे काम करून देण्याचा शब्द कंत्राटदाराने दिला होता. त्यानंतरही शेतातील मातीची लेव्हलिंग (समतल) केली गेली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून सदर काम पूर्ण केले. शेतकऱ्यांवर विनाकारण भुर्दंड बसला असून, हा खर्च संबंधित कंपनीने द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून, तातडीने उर्वरित नाली काम करून द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.