नागपूर : कोरोनाची लागन झालेल्या ज्या रुग्णांकडे गृहविलगीकरणाची व्यवस्था नाही, अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) ठेवण्यात येते. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने अचानक तोंड काढल्याने, जिल्हा प्रशासन पुन्हा अलर्ट झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा सीसीसी सुरू करण्याचे निर्देश तहसिलदारांना दिले आहे. परंतु तहसिलदारांना सीसीसी सुरू करण्यासाठी जागाच उपलब्ध झाली नसल्यामुळे ग्रामीण भागात सीसीसी सुरू होवू शकले नसल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात २०२० मध्ये कोरोना पसरल्यानंतर प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात सीसीसी सुरु केले होते. या केंद्रावर कोरोना संशयितांसोबतच सौम्य/मध्यम लक्षणे असलेल्यांना यांना ठेवण्यात येत होते. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत होते. रुग्णांची संख्या जशी जशी वाढत गेली, तसतसे प्रशासनाने रुग्णांना गृहविलगीकरणासाठी परवानगी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रशासनानेही सीसीसीकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण भागातील अनेक सीसीसी हे शाळेच्या परिसरात सुरू होते. मात्र, यानंतर शाळा सुरू झाल्यात. त्यामुळे तेथून सीसीसी ही बंद करावे लागलेत. परंतु त्यानंतर आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील तेराही तालुक्यात पुन्हा सीसीसी कार्यान्वित करण्यासाठी जागेचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. सोबतच जिल्हा आरोग्य विभागाला सीसीसीसाठी मनुष्यबळ पुरविण्याबाबतही सूचना केल्यात. पण सीसीसी सुरू करण्यासाठी जागाही उपलब्ध झाली नसल्याने प्रशासनही हतलब आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये काटोल, उमरेड व हिंगणा हे तीनच सीसीसी सुरू असल्याची माहिती आहे. तर सावनेर, कामठी, नागपूर ग्रामीण या तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असतानाही येथे सीसीसीची सोय उपलब्ध नाही.