सज्जन पाटील
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : कुही तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत आहे. मात्र, यावर्षी वाढीव मजुरी देऊनही कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना प्रसंगी बाहेरगावाहून मजूर आणावे लागत असून, त्यासाठी वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही करावा लागत आहे.
धान व मिरचीच्या उत्पादनासाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या कुही तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून साेयाबीन व कपाशीच्या पिकाकडे वळले आहेत. काही वर्षांपासून साेयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट येत असल्याने, बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकावर लक्ष केंद्रित केले. यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीला भरपूर पाऊस काेसळल्याने तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीच्या पिकाची वाढ खुंटल्यागत झाली. त्यातच फलधारणा व्हायला सुरुवात झाल्याने बुरशीमुळे पहिल्या फ्लॅशची बाेंडे सडायला लागली. त्यानंतर लगेच कपाशीवर गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यातून पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे यावर्षी कापसाचा उत्पादनखर्च तुलनेत वाढला आहे.
दरवर्षी महिला मजूर सहा ते सात रुपये प्रति किलाेप्रमाणे कापसाची वेचणी करायचे. शिवाय, एक महिला दिवसभरात किमान ५० ते ६० किलाे कापसाची वेचणी करायची. यावर्षी कापूस वेचणीची मजुरी १० रुपयावर पाेहाेचली असून, ती देऊनही महिला कापूस वेचणीला यायला तयार नाहीत. शिवाय, एक महिला दिवसभरात केवळ १० ते १२ किलाे कापूस वेचत असल्याने, तसेच मजुराला २०० रुपये प्रति दिवस मजुरी द्यावी लागत असल्याने एक किलाे कापूस वेचायला शेतकऱ्यांना जवळपास २० रुपये माेजावे लागतात.
यावर्षी बाेंडअळीमुळे कापसाचे वजन कमी झाले असून, बाेंडातील कापूस चिकट असल्याची तसेच कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने कपाशीपेक्षा इतर पीक घेणे साेयीचे आहे, अशी प्रतिक्रिया मांढळ येथील लक्ष्मण माेटघरे, मनाेहर माेटघरे, राेशन कुरजेकर, नवेगाव येथील खुशाल ठवकर, वग येथील गणेश तितरमारे, पारडी येथील मनाेज खवास, वीरखंडी येथील पुष्पराज लाेखंडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिली.
...
साेयाबीनवर फिरविले राेटाव्हेटर
कुही तालुक्यात साेयाबीनचाही पेरा वाढला आहे. मात्र, काही वर्षांपासून साेयाबीनचे पीकही परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी बुरशी व विषाणूजन्य राेगामुळे शेतातून साेयाबीनचा एक दाणाही घरी आला नाही. त्यामुळे राेटाव्हेटरने पीक काढावे लागले, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. काहींनी सूर्यफुलाचे पीक घेण्याचा प्रयाेग केला आहे. अलीकडच्या काळात मिरचीचा उत्पादनखर्च वाढत चालला असून, तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने तसेच मिरची ताेडायला मजूर मिळत नसल्याने मिरचीचे पीकही परवडण्याजाेगे राहिले नाही, असे मिरची उत्पादकांनी सांगितले.