गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताचे स्वातंत्र्यसमर म्हणजे धगधगते पर्व! इंग्रजांच्या १५० वर्षांच्या जुलमी राजवटीमधील १९४२ चे पर्व या देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे. संपूर्ण देश पारतंत्र्यात असताना नागपूर सहा दिवस आणि चिमूर तीन दिवस स्वातंत्र्यात ठेवण्याची मर्दुमकी येथील क्रांतिकारकांनी दाखविली होती. अंगावर रोमांच उभा करणारा हा वीरश्रीचा इतिहास म्हणजे क्रांतिलढ्यातील नागपूरचे धगधगते पर्व आहे.महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘भारत छोडो’चा आदेश देऊन हा देश सोडण्यास सुनावले. बापूंच्या या आदेशाबरहुकूम देशात क्रांतीचे एक धगधगते पर्व उभे राहिले. संपूर्ण देश इंग्रजांच्या विरोधात पेटून उठला. ‘लाठी गोली खायेंगे, वंदे मातरम् गायेंगे’असे म्हणत तरुणाई पुढे आली. इंग्रजांच्या गोळ्यांचा सामना या निधड्या वीरांच्या पोलादी छातीने के ला.संपूर्ण देशात हे आंदोलन पेटलेले असताना यात नागपूर कसे मागे राहील? विदर्भातही हे आंदोलन आधीपासूनच पेटलेले होते. नागपूर, चंद्रपूर, चिमूर, आष्टी, यवतमाळ, पुसद ही आंदोलनाची प्रमुख केंद्रे होती. अनेक कार्यकर्ते भूमिगत राहून काम करीत होते. राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची खंजिरी विदर्भात क्रांतीच्या ज्वाला पेरत होती. त्यामुळे विदर्भाही देशप्रेमाने धगधगत होता. नागपूर शहर म्हणजे क्रांतिकारकांचा गड मानला जायचा. येथून पेटलेली क्रांतीची मशाल पुढे सर्वत्र पसरत गेली.१९४२ मध्ये गोवालिया टँक मैदानावरील मुंबई काँग्रेसच्या बैठकीत ‘भारत छोडो’आंदोलनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यानंतर लगेचच महात्मा गांधींसह १९ जणांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करून पुण्याला घेऊन जाताना मुंबईतील व्हीटी स्टेशनवर गांधींजींंनी जनतेला ‘करा किं वा मरा’ असा संदेश दिला. त्याचे लोण नागपुरातही पोहचले. इंग्रजांंनी धरपकड सुरू केली. मुंबईतील अधिवेशनात सहभागी असलेले नागपुरातील प्रमुख नेते रविशंकर शुक्ला आणि द्वारकाप्रसाद मिश्रा भूमिगत झाले. मात्र त्यांना हुडकून इंग्रजांनी अटक केली.दरम्यान, उत्तर प्रांतिक मंडळाने गढवाल दिवसाचे निमित्त साधून ९ आॅगस्ट १९४७ ला क्रांतिलढ्याची सुरुवात सत्याग्रहाने केली. इंग्रजांनी पोलीस अधीक्षकांचा बंगला सुरक्षित राहावा यासाठी दोन भागात दोर बांधून एकीकडे १४४ प्रतिबंधात्मक कलम लावले; दुसऱ्या भागात आंदोलनाची परवानगी होती. या सत्याग्रहाचे पडसाद नागपूरसह खापा, सावनेर, मोवाड, नरखेड, रामाकोना, लोधीखेडा या गावांमध्ये उमटले.गांधींजींच्या अटकेनंतर इतवारीमध्ये तीन हजार क्रांतिकारकांनी मोर्चा काढला. जमाव फारच प्रक्षुब्ध होता. ‘वंदे मातरम’ म्हणताच लोकांना स्फुरण चढत होते. या जमावाने इतवारीमधील पोलीस ठाण्याला आग लावली.हिंदुस्थानी लाल सेनेचे कार्यकर्ते यात आघाडीवर होते. त्यानंतर सीटी पोस्ट आॅफीसही जाळण्यात आले. अनियंत्रीत झालेले क्रांतीकारी पुढे सरकत होते. वाटेत दिसतील त्या इंग्रजांच्या शासकीय इमारतींना भक्ष करण्याचे काम सुरू होते. दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ले, हत्या यामुळे संपूर्ण शहरच पेटल्यागत झाले होते.गांजाखेडा येथील पोलीस ठाणे, मेयो रुग्णालयासमोरील पोस्ट आॅफीसही लुटून जाळण्यात आले. या लुटीच्या रकमेतून शस्त्र, बंदूका, बाँबची खरेदी करण्यात आली. अनेकांचा या आंदोलनात सक्रीय सहभाग होता. श्यामराव जरीवाला यांनी २०० युवकांची टीम तयार करून शहरातील टेलिफोनच्या तारा तोडून इंग्रजांची संपर्कयंत्रणाच खंडित काम केले.इंग्रज सरकारची फौजही या क्रांतीकारकांच्या आंदोलनापुढे अपुरी ठरली. तब्बल सात दिवस नागपूर क्रांतीकारकांच्या ताब्यात होते. या शहरात त्या काळात इंग्रजांचे नव्हे तर क्रांतीकारकांचे सरकार होते.पुढे १७ आॅगस्टनंतर मात्र नागपूर हळूहळू शांत होऊ लागले. तोपर्यंत संचारबंदी सुरूच होती. पुढे इंग्रज सरकारने अनेकांवर खटले भरले. अनेकांना शिक्षा केली. १९४२ ते १५ आॅगस्ट १९४७ या काळात नागपुरात ९३ क्रांतीकारकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मृतिसाठी राज्य सरकारने स्वातंत्र्यांनतर रेल्वे पुलाजवळ जयस्तंभ उभारला. चिमुरमध्ये तेथील नागरिकांनी शहीद स्मारकाची उभारणी केली. आष्टीमध्येही शहिदांच्या स्मृतिसाठी स्मारक उभारण्यात आले.शंकर महाले म्हणाले, मला पकडा, मी गुन्हा केला !‘चले जाव’ आंदोलनाची धग नागपुरात बरेच दिवस कायम होती. १७ आॅगस्ट १९४७ नंतर आंदोलन हळूहळू थंडावत गेले. मात्र अनेक ठिकाणी क्रांतीकारकांकडून सरकारविरोधी घटना सुरूच होत्या. अशात काही अंदोलकांनी नबाबपुरा पोलीस चौकी लुटून जाळली. पोलिसांनी पाच-सहा जणांना अटक केली. मात्र १८ वर्षाचा शंकर दाजीबा महाले हा तरूण पोलिसांपुढे आला. त्यांना कशाला पकडता, मी जाळली पोलीस चौकी, मला पकडा, असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सर्वांना सोडून त्याला पकडले. न्यायालयात खटला चालला. १५ जानेवारी १९४३ रोजी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात या निधड्या छातीच्या तरूणाला इंग्रजांनी फासावर लटकविले.चिमूर-आष्टीचा सुवर्णाक्षरी स्वातंत्र्य लढा१९४२ च्या आंदोलनात चिमूर आणि आष्टीतील क्रांतीलढा देशभर गाजला. राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांची भूमिका या लढ्यामध्ये मोलाची होती. ९ एप्रिल १९४२ मध्ये तुकडोजी महाराज आष्टीला आले होते. या भेटीतच त्यांनी जनतेला क्रांतीलढ्याचा आणि सत्याग्रहाचा संदेश दिला. दरम्यान महात्मा गांधींसह वरिष्ठ नेत्यांच्या अटकेनंतर हे गाव पेटून उठले. रामभाई लोहे यांच्या नेतृवातील जमावार पोलिसानी गोळीबार केला. यात डॉ. गोविंद मालपे, रशिद खाँ, हरीलाल, केशव ढोगे, पंची गोंड, उदेभान कुबडे हे सहा क्रांतीकारी शहीद झाले. या घटनेनंतर आष्टीमध्ये क्रांतीची आग भडकली. पोलीस ठाणे जाळून लोकांनी इन्सपेक्टर मिश्राला ठार केले. तिथे तिरंगा फडकविला.चिमूरमध्ये तर याहून भयंकर परिस्थिती होती. ९ आॅगस्ट १९४७ रोजी हजारोंचा जमाव आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला. पोलिसांनी लाठीमार केला. जमाव चिघळला. चिमूरचे पोलीस ठाणे लोकांनी पेटवून दिले. यात डुंगाजी नावाचा पोलीस अधिकारी ठार झाला. पोलिसांच्या गोळीबारात बाबूराव हिºहे, बालाजी रायपुरकर यांच्यासह नऊ जण शहीद झाले. जमाव बेधुंद झाला होता. पोलीसही घाबरून लपून बसले. जमावाने पोलीस ठाण्यावरचा युनियन जॉक उतरविला आणि तिरंगा फडकविला. तब्बल तीन दिवस चिमूर स्वतंत्र होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बार्लिनच्या रेडिओवरून चिमूर स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. नंतर मात्र इंंग्रजांनी पोलिसांची मोठी कुमक पाठविली. अनेकांना अटक केली. प्रचंड मारझोड केली. ३९ आंदोलकांना काळ्या पाण्याची शिक्षा केली.
नागपुरात सहा अन् चिमुरात तीन दिवस होते स्वातंत्र्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:22 AM
संपूर्ण देश पारतंत्र्यात असताना नागपूर सहा दिवस आणि चिमूर तीन दिवस स्वातंत्र्यात ठेवण्याची मर्दुमकी येथील क्रांतिकारकांनी दाखविली होती. अंगावर रोमांच उभा करणारा हा वीरश्रीचा इतिहास म्हणजे क्रांतिलढ्यातील नागपूरचे धगधगते पर्व आहे.
ठळक मुद्देपारतंत्र्यातही क्रांतिकारकांचे सरकारक्रांतिलढ्यात नागपूरचे धगधगते पर्व