नागपूर : उपराजधानीतील मध्यवर्ती भागात असलेल्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात बुधवारी पहाटे खळबळ उडाली. एका निनावी फोनमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना घाम फोडला. पोलिस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोननंतर काही मिनिटांतच पोलिस ठाणे रिकामे करण्यात आले. सखोल तपासणीनंतर कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे निष्पन्न झाले व ड्युटीवरील सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र, पोलिस ठाण्यात स्फोट होणार असल्याची धमकी देत खोडसाळपणा करण्याइतपत अज्ञात आरोपीची मजल गेल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. ११२ या क्रमांकावर अज्ञात आरोपीने फोन केला व सीताबर्डी पोलिस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगत फोन कट केला. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. तातडीने बीडीडीएस पथकाला बोलविण्यात आले व काही मिनिटांतच संपूर्ण पोलिस ठाणे रिकामे करण्यात आले. पोलिस ठाण्यातील कर्मचारी, लॉकअपमधील आरोपी व अधिकारी सर्व बाहेर आले. बीडीडीएसच्या पथकाने पोलिस ठाणे तसेच आजूबाजूच्या परिसराची सखोल तपासणी केली. मात्र, कुठेही स्फोटक वस्तू किंवा ज्वलनशील पदार्थ आढळले नाही.
तो खोडसाळपणाच, क्रमांक ट्रेस करणे सुरू
अज्ञात व्यक्तीने फोन करून खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सकाळी शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल बेडवाल यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फोन नेमका कुणी केला, याचा शोध घेण्यात येत असून क्रमांक ट्रेस करण्यात येत आहे.