योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम ‘अपडेट’ करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एआयसीटीई’च्या (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे पालन करत विद्यापीठाने अभ्यासक्रमाला नवीन रुप देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. वर्षानुवर्षे असलेला रटाळपणा दूर करत ‘अॅक्टिव्हिटी’ आधारित अभ्यासक्रम तयार झाला आहे. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासूनच सुरुवात झाली असून नवीन सत्रापासूनच नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहणार आहे.
देशभरात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला. याअंतर्गतच ‘एआयसीटीई’ने पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम ‘अपडेट’ करणे आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नागपूर विद्यापीठाने २०१८ साली अभ्यासक्रमात बदल करण्यासंदर्भात पावले उचलली होती. यासंदर्भात प्राचार्यांची समितीदेखील नेमण्यात आली होती. मध्यंतरीच्या कालावधीत ही प्रक्रिया काहीशी थंडावली होती. मात्र विद्यापीठात सत्ताबदल झाल्यानंतर परत अभ्यासक्रम ‘अपडेट’ करण्यासंदर्भात पावले उचलण्यात आली.
नवीन अभ्यासक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अभ्यासक्रमात उद्योगक्षेत्राची आवश्यकता व विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित करणे या दिशेने बदल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘अॅक्टिव्हिटी’ आधारित अभ्यासक्रम राहणार आहे. यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रकारे प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतील व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांना पुस्तकातील मुद्देदेखील स्पष्टपणे कळतील. या अभ्यासक्रमामुळे शिक्षण क्षेत्र व उद्योग क्षेत्र यांच्यातील ‘लिंकेज’देखील वाढण्यास मदत होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी व्यक्त केला.
बदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
कोरोनामुळे यंदा अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबली. बुधवारपासूनच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली व सर्वसाधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रथम वर्षाचे वर्ग सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर यंदा नवीन अभ्यासक्रम लागू होणार की नाही याबाबत अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये संभ्रम कायम आहे. यासंदर्भात विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.राजेश शिंगरू यांना संपर्क केला असता त्यांनी नवीन अभ्यासक्रम जवळपास तयार झाला असल्याची माहिती दिली. बदलासंदर्भात विद्यापीठाने वेगाने पावले उचलली असून यावर्षीच्या सत्रापासूनच अभ्यासक्रम लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कुलगुरूंनी सांगितले.