नागपूर: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील नवनिर्मित राममंदिरात रामलल्लाच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून या दिवशी भाजपकडून जंगी जल्लोष करण्यात येणार आहे. शहरातील चौकाचौकात आतषबाजी करत अक्षरश: दिवाळी साजरी करण्याच्या सूचना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत बुधवारी शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले.
पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीत २२ जानेवारीला कशा प्रकारे जल्लोष करायचा यावर मंथन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे प्रत्येक भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत मिळून प्रत्येत चौक व वस्तीत भगवे झेंडे व तोरण लावत वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्वच मोठ्या चौकात जोरदार आतषबाजी करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे सहाही मंडळ व २२ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सखोल नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संघ व विहिंपतर्फे नागरिकांना घरोघरी जाऊन मंदिर अक्षता वाटप करण्यात येत आहे.
त्यांच्याप्रमाणे आता भाजपचे कार्यकर्तेदेखील गृहसंपर्क साधणार आहेत. निवडणूकांच्या तोंडावर भाजपसाठी गृहसंपर्क वाढविण्याची ही चांगली संधीदेखील मानण्यात येत आहे. या बैठकीला सरचिटणीस राम अंबुलकर, गुड्डू त्रिवेदी, अर्चना डेहनकर, शिवानी वखारे दाणी, संजय पांडे, भोजराज डुंबे, वैशाली चोपडे, चंदन गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रीय युवक दिनीदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजनदरम्यान, १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवक दिवसाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आली. ११ व १३ तारखेला यातील अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.