व्यापारी संघटनांशी चर्चा न करता निर्बंध लावण्यात येणार असल्याने व्यापारी पॅनिक झाले आहेत. व्यापाऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. राज्य सरकारने निर्बंधाचा निर्णय घाईने घेऊ नये.
-अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.
चर्चेनंतरच निर्णय घ्या
राज्य सरकारने एकतर्फी निर्णय न घेता व्यापारी संघटनांसोबत चर्चा करावी. पूर्वीही असेच निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. पुढे काही महिने निर्बंध राहिल्यास व्यापारी आत्महत्या करतील. याची जबाबदारी सरकारवर राहील.
-दीपेन अग्रवाल, मुख्य संयोजक, सरकार जागवा, वाणिज्य वाचवा समिती.
हॉटेल व रेस्टॉरंट टारगेट
२० दिवसांपूर्वी वेळेचे निर्बंध हटविल्यानंतर हॉटेल व रेस्टॉरंट थोडेफार सुरू झाले होते; पण आता पुन्हा संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक हॉटेल्स आधीच बंद असून आता पुन्हा बंद होण्याचे संकट आहे.
-तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन.
व्यापाऱ्यांचे ५० कोटींचे नुकसान होणार
गणेशोत्सवानिमित्त अनेकांनी सजावट व विविध वस्तूंची ऑर्डर दोन महिन्यांपूर्वी दिली होती. सर्व माल येऊन विक्रीला सुरुवात झाली आहे; पण राज्य सरकारच्या घोषणेमुळे ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असून किरकोळ व्यापारी माल खरेदीसाठी मागेपुढे पाहत आहेत. या सर्व घडामोडींमुळे नागपुरात गणेशोत्सवाच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना जवळपास ५० कोटींचा फटका बसणार आहे. अनेकांना माल विक्रीविना पडून राहील. गणेशोत्सवात दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे बंधन सरकारने आणू नयेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.