लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी लॅब, आरटीपीसीआर, सीबीसी, सीआरपी,डी-डायमर, एलएफटी, केएफटी, एचआरसीटी तपासणीचे वेगवेगळे दर आकारले जात आहेत. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दिले.
शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खासगी प्रयोगशाळेत विविध तपासण्यांचे दर वेगवेगळे आकारले जात असल्याची चर्चा झाली. तेव्हा पालकमंत्र्यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले. यासोबतच मेडिकलमध्येसुद्धा पॅथॉलोजी नमुने तपासणीसाठी बाहेर पाठविण्याच्या अनेक तक्रारी येत असून मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी याची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही दिले.
२४ तासात दोन हत्येचाही घेतला आढावा
नागपुरात २४ तासात दोन हत्येच्या घटना घडल्या. याचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला. शासनाने निर्बंध ३१ मे पर्यंत वाढविले आहे. नागपूर शहरातील रुग्ण संख्या कमी व्हायला लागली म्हणून नागरिक बाहेर पडणार नाहीत याची काळजी पोलिसांनी घ्यावी. रिकामटेकड्यांवर कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू ठेवावी. तसेच त्यांची चाचणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याच्या मोहिमेला गती देण्याबाबतही त्यांनी पोलीस आयुक्तांना निर्देशित केले.