नागपूर : मी मुख्यमंत्री असताना कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी प्रक्रिया सुरू केली हाेती, पण मी आता मुख्यमंत्री नाही, गद्दारांनी आमचे सरकार पाडले. हे गद्दारांचे सरकार आहे आणि यांच्याकडून तुमचे भले हाेण्याची अपेक्षा करू नका, त्यांना धडा शिकवा. आमचे सरकार आले तर तुम्हाला माेर्चे काढण्याची गरज पडणार नाही, असा शब्द माजी मुख्यमंत्री व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिला.
मंगळवारी राज्य सरकारच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी माेर्चा काढला. यात सहभागी हाेण्यासाठी राज्यभरातून लाखाे कर्मचारी नागपूरला पाेहचले. तत्पूर्वी यशवंत स्टेडियमच्या धरणे मंडप स्थळी सभा घेण्यात आली. ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असे शब्द असलेल्या टाेप्या घातलेल्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण यशवंत स्टेडियम फुल्ल झाले हाेते. त्यातले अर्धे आंदाेलनकर्ते बाहेर थांबून हाेते. या सभास्थळी उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे पुत्र व माजी मंत्री आदित्य ठाकरे, संजय राऊत, शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव आदी उपस्थित हाेते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यासह केंद्र सरकारवरही सरसंधान साधले. महाराष्ट्रात हे सरकार अवैध पद्धतीने आले आहे. हे खाेकेबाज व धाेकेबाज सरकार आहे. केंद्र सरकारच्या मंत्र्यांप्रमाणे खाेटे बाेलून भूलथापा देण्याची यांना सवय आहे. आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरेकी ठरविणाऱ्या केंद्र सरकारप्रमाणे हे सरकार फसवे आहे. त्यामुळे या फसव्या घाेषणांच्या मायाजाळात फसू नका, यांना खाली पाडा. मी तुमच्यासमाेर खाेटे बाेलणार नाही पण मी आता मुख्यमंत्री नाही. मात्र तुमची मागणी पूर्ण हाेईपर्यंत शिवसेनेची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहिल, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली. यानंतर आमदार कपील पाटील, आ. काळे, आ. अभिजित वंजारी यांनीही कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाला भेट दिली.