लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दीक्षांत सभागृह न देण्याचा मुद्दा विधीसभेतदेखील उपस्थित झाला. डॉ.बबन तायवाडे यांनी उपस्थित केलेला मुद्दा कुलगुरुंनी फेटाळून लावला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार दीक्षांत सभागृह कुठल्याही खासगी कार्यक्रमांसाठी देण्यात येणार नाही. इतकेच काय तर विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनांनादेखील सभागृह मिळणार नाही, असे डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने २९ जुलै रोजी विद्यापीठाने भाडेतत्त्वावर तीन तासांसाठी दीक्षांत सभागृह उपलब्ध करून देण्याचा अर्ज ९ जुलै रोजी करण्यात आला होता. १३ जुलै रोजी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत दीक्षांत सभागृह केवळ विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या आधारावर विद्यापीठाने हे सभागृह या कार्यक्रमाला देण्यास नकार दिला. यावरुन विधीसभेच्या बैठकीची सुरुवात झाल्यानंतर लगेच डॉ.तायवाडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काळमेघ यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी मौलिक योगदान दिले. तरीदेखील त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी का दिली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र संबंधित प्रस्ताव मांडण्याची परवानगीच डॉ.काणे यांनी दिली नाही. त्यामुळे काही काळ सदस्य संतप्त झाले होते.कर्मचारी संघटनांनादेखील सभागृह मिळणार नाहीव्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयाचेच प्रशासन पालन करत आहे. विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह कुठल्याही खासगी कार्यक्रमांना देण्यात येणार नाही. केवळ शासकीय व विद्यापीठाचेच कार्यक्रम येथे होतील. विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनांनादेखील हे सभागृह कार्यक्रमासाठी मिळणार नाही, असे डॉ.काणे यांनी स्पष्ट केले. गुरुनानक भवन, मदर टेरेसा सभागृह, बुटी हॉल मात्र नक्कीच कार्यक्रमांसाठी मिळू शकतील, असे त्यांनी सांगितले.