वाहतूक नियम मोडणाऱ्यांची तयार होणार ‘कुंडली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 07:26 PM2018-01-11T19:26:43+5:302018-01-11T19:28:57+5:30
वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता ‘कुंडली’ तयार होणार आहे. त्यासाठी शासनाने ‘ट्राफिक व्हायोलेन्स डाटाबेस’ सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याच्या उपयोगितेचे प्रात्याक्षिक केले जात आहे. हे सॉफ्टवेअर येत्या सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता ‘कुंडली’ तयार होणार आहे. त्यासाठी शासनाने ‘ट्राफिक व्हायोलेन्स डाटाबेस’ सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याच्या उपयोगितेचे प्रात्याक्षिक केले जात आहे. हे सॉफ्टवेअर येत्या सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाणार आहे.
शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर प्रत्येक नवीन गुन्ह्यासाठी अधिक कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु, सध्या एका व्यक्तीने कितीवेळा वाहतूक नियम मोडले हे तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर प्रत्येक गुन्ह्यासाठी सारखीच कारवाई केली जाते. ‘ट्राफिक व्हायोलेन्स डाटाबेस’ सॉफ्टवेअर कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक नियम मोडणाऱ्या प्रत्येकाचा डेटा गोळा होईल. संबंधित व्यक्तीने किती गुन्हे केले हे एका क्लिकवर पुढे येईल. परिणामी, त्यानुसार योग्य ती कारवाई करणे शक्य होईल. याशिवाय शासन प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यावर विचार करीत आहे. यासंदर्भात विविध शक्यता पडताळल्या जात आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजीतसिंग कलसी यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. हर्निश गढिया यांनी बाजू मांडली.