नागपूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार आहेत. या वृत्तांमुळे व्यापारी आणि लोकांमध्ये संभ्रम पसरला आहे. पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीनंतर उद्भवलेली स्थिती आता तर होणार नाही ना, अशी भीती लोकांमध्ये आहे. सध्या बँकांमध्ये जुन्या नोटा बदलविण्यासाठी गर्दी होत नसली तरीही २५ जानेवारीपासून सर्वच बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्यस्थिती लोकांना कळल्यास बँकांमध्ये गर्दी होणार नाही, पण यासाठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे लोकांचे मत आहे. रिझर्व्ह बँकेनी मुदत दिल्यामुळे व्यवहारात या नोटा स्वीकारत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेची लेखी सूचना आल्यानंतर सर्वच बँका या नोटा बदलवून देण्यासाठी सज्ज राहणार असल्याचे मत बँकांच्या अधिकाऱ्यांचे आहे.
प्राप्त माहितीनुसार आरबीआय अचानक कोणतीही नोट बंद करू इच्छित नाही. १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा परत घेण्याची योजना आहे. यांच्या नवीन नोटा आधीपासूनच चलनात आल्या आहेत. पुरेशा नोटा चलनात आल्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जाणार आहेत. या संदर्भात शनिवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी यासंदर्भात शनिवारी माहिती दिली आहे. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा संभ्रम लोकांमध्ये राहणार नाही. १० रुपयांचे नाणे चलनात राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बँकांना अजूनही सूचना नाहीत
१००, १० आणि ५ रुपयांची जुनी नोट बदलण्यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिले आहे. या जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनातून बाहेर पडणार आहेत. या नवीन नोटा आधीच चलनात आहेत. त्यानंतरही लोकांची बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. जुन्या नोटा बदलवून देण्यासंदर्भात बँकांना रिझर्व्ह बँकेची अजूनही सूचना आलेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याने माहिती दिल्याने याबाबत सोमवारी वा त्यानंतर सूचना येण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेचा निर्णय मान्य
१००, १० आणि ५ रुपयांची जुनी नोट बदलविण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला असेल तर त्याची विस्तृत माहिती नाही. शिवाय रिझर्व्ह बँकेची अधिकृत सूचनाही आली नाही. या नोटा चलनातून बाहेर काढण्यावर निर्णय झाला असेल तर नोटा बदलविण्यासाठी लवकरच सूचना येईल. त्यानुसार बँकेतर्फे पालन करण्यात येणार आहे.
संजय भेंडे, अध्यक्ष, नागपूर नागरिक सहकारी बँक
नोटा बदलवून देण्याची सूचना नाही
रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला असला तरी याची अधिकृत सूचना बँकांना आलेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत.
मनोज करे, उपमहाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र.
पूर्वीच्या नोटाबंदीप्रमाणे गोंधळ होऊ नये
पूर्वी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा एका रात्रीतून चलनातून बाहेर काढण्याच्या निर्णय घेतल्यानंतर लोकांमध्ये गोंधळ उडाला होता. नोटा बदलवून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या होत्या. आता सरकारने मार्च-एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता नाही. १००, १० आणि ५ रुपयांची नवीन नोट आधीच चलनात आहे. त्यामुळे लोक आपल्या सोयीनुसार जुन्या नोटा बदलतील. व्यापारीही जुन्या नोटांचा स्वीकार करीत आहेत.
शिवप्रताप सिंह, सचिव, नागपूर इतवारी किराणा असोसिएशन.
व्यापारी स्वीकारत आहेत जुना नोटा
१००, १० आणि ५ रुपयांची जुनी नोट चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. पण त्याकरिता मार्च-एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे लोकांना आणि व्यापाऱ्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. व्यापारी वा लोकांकडून जुन्या नोटा बँका स्वीकारणार आहेत. व्यापाऱ्यांनीही या जुन्या नोटा स्वीकाराव्यात, असे व्यापाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे लोकांची अडवणूक होणार नाही.
प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.