नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या मेडिकलचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. यासाठी शासनाने एक कोटी ९० लाख ५४ हजार रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून रुग्णालयातील नव्या व जुन्या इमारतींचे ‘ऑडिट’ करून आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे.
मेडिकलच्या अंतर्गत येणाऱ्या इमारतींच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम (वैद्यकीय) विभागाची आहे. नियमानुसार, दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक यांच्या स्तरावर त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या इमारतीची तपासणी करणे, दर पाच वर्षांनी कार्यकारी अभियंत्यांनी इमारतीची तपासणी करून तसा अहवाल सादर करणे आवश्यक असते; परंतु याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. यामुळे ११ डिसेंबर २०१९ रोजी टीबी वॉर्ड परिसरातील त्वचारोग विभागाच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून एका वयोवृद्ध रुग्णाचा व एका महिला रुग्णाच्या नातेवाइकाचा जागीच मृत्यू झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून या प्रकरणाची दोन सदस्याने चौकशी केली; परंतु दोषींवर अद्यापही कारवाई झाली नाही. आता स्ट्रक्चरल ऑडिटसाठीच्या निधीला मंजुरी मिळाल्याने तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे.
सहा सज्जे तोडले होते
स्लॅब कोसळल्याच्या घटनेला गंभीरतेने घेऊन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सर्व इमारतीची पाहणी करून जीर्ण बांधकाम तोडण्याचा सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार सहा सज्जे तोडले होते. यात वसतिगृह क्रमांक १ ते ४, मार्ड वसतिगृह व शासकीय दंत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरील सज्जांचा समावेश होता.
मेडिकलचा हा भाग धोकादायक
दोन वर्षांपूर्वी बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीत पेईंग वॉर्डच्या बाजूने पहिल्या माळ्यावर गेलेल्या पायरीचा भाग क्षतिग्रस्त झाल्याचे आढळून आले होते. बांधकाम विभागाने हा भाग बंद केला होता. लोखंडी खांबाने त्याला आधारही दिला होता. नेत्ररोग विभागाची ओपीडीची इमारतीला लागून असलेली इमारतही धोकादायक असल्याचे बांधकाम विभागाने कळविले आहे. ही इमारत आजही उभी आहे. टीबी वॉर्डच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरच्या पहिल्या माळ्यावर एका गाळ्यातील बाल्कनी क्षतिग्रस्त झाली आहे. यालाही तोडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.