अपघाताचा धोका : महापालिकेचा रस्ते दुरुस्तीचा खर्च वाढलानागपूर : महापालिका, नासुप्र, मेट्रो रेल्वे यांच्या मार्फत सुरू असलेली कामे तसेच मोबाईल कंपन्यांच्या केबल टाकण्याच्या कामासाठी शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. खोदकामाच्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती होत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दुसरीकडे चांगले रस्ते नादुरुस्त होत असल्याने महापालिकेचा रस्ते दुरुस्तीवरील खर्च वाढला आहे. गरज भासली व मनात आले की, खोदकामाला सुरुवात केली जाते. काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर खोदकाम केले जाते. अनेकदा वर्दळीच्या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर तातडीने काम पूर्ण करून ते व्यवस्थित बुुजवले जात नाही. पंचशील चौकाच्या बाजूला कॅनलरोडवर काही दिवसापूर्वी खड्डा खोदला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. रामदासपेठ भागात केबल टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. बुटी हॉलच्या बाजूला खोदकाम करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काँग्रेसनगर चौकात वर्दळीच्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. शहराच्या इतर भागात ठिकठिकाणी असे खोदकाम सुरू आहे. उठसूट होणाऱ्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते नादुरुस्त होत असल्याने याला आळा घालण्यासंदर्भात सभागृहात अनेकदा चर्चा करण्यात आली होती. खोदकाम करताना विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात यावा असे निर्देशही देण्यात आले. विकास कामे आवश्यक असली तरी रस्ते दुरुस्ती वा डांबरीकरण करण्यापूर्वी विविध विभागात समन्वय नाही. त्यामुळे काही दिवसापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या मार्गावर खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे रस्ते नादुरुस्त होत असल्याने महापालिकेचा डांबरीकणावरील खर्च पाण्यात जातो. अनेकदा कंत्राटदार काम तातडीने पूर्ण करण्यासाठी ड्रील मशीनचा वापर करून खोदकाम करतात. परंतु कामगारांना जमिनीखालील विद्युत वाहिनी वा पाण्याच्या पाईपलाईनची माहिती नसते. त्यामुळे परिसरातील वीज व पाणीपुरवठा बाधित होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने याबाबत त्यांच्यात रोष आहे. (प्रतिनिधी)नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाईशहरातील रस्त्यांवर वा कडेला केबल, पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यापूर्वी महापालिकेकडून नकाशा मंजूर केला जातो. रस्त्याचे डांबरीकरण वा दुरुस्तीपूर्वी खोदकामाची गरज आहे का, याची माहिती संबंधित विभाकडे असणे गरजेचे आहे. विविध विभागांनी समन्वय ठेवण्याची गरज आहे. यासाठी तातडीने बैठक आयोजित केली जाईल. हेतुपुरस्पर नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई केली जाईल. -रमेश सिंगारे, अध्यक्ष स्थायी समिती
मनात आले तिथे खोदकाम!
By admin | Published: January 12, 2016 3:22 AM