लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅमेझॉनवर थर्मास बुक केल्यानंतर सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीच्या खात्यातून ५ लाख २५० रुपये उडविल्याची घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ५०० रुपयांच्या थर्माससाठी त्यांना एवढी मोठी रक्कम गमावण्याची वेळ आली.
पैसे आणि पेट्रोल वाचविण्यासाठी बहुतांश नागरिक ऑनलाईन खरेदी करतात. परंतु ऑनलाईन खरेदी करताना अनेकदा सायबर गुन्हेगार नागरिकांची लूट करीत असल्याच्या घटना घडतात. शेंडे नगर, टेका नाका येथील रहिवासी विज्ञान मेश्राम (५३) हे रेल्वेत लोकोपायलट या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी १८ जुलैला अॅमेझॉनवरून एक थर्मास बुक केला. थर्मासची रक्कमही त्यांनी ऑनलाईन पाठविली. परंतु त्यांना थर्मास आवडला नसल्यामुळे त्यांनी ऑर्डर रद्द केली. ऑर्डर रद्द केल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे परत यायला हवे होते. परंतु पैसे न आल्यामुळे त्यांनी गुगलवर अॅमेझॉन कस्टमर केअरचा नंबर शोधून फोन केला. तो नंबर एका सायबर गुन्हेगाराचा होता. त्याने मेश्राम यांना एनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करायला सांगितले. अॅप डाऊनलोड करून त्यांनी कस्टमर केअरचा पासवर्ड दिला. पासवर्ड देताच त्यांच्या खात्यातून ५ लाख २५० रुपये सायबर गुन्हेगाराने उडविले. लगेच त्यांनी कपिलनगर पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद नोंदविली. कपिलनगर पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.