नागपूर : आजुबाजुला राहणारे अल्पवयीन प्रेमीयुगुल घरातून पळून गेले. ते लक्षात आल्यानंतर पालक आणि पोलिसांनी त्यांची शोधाशोध केली. पहाटेच्या वेळी ते गावाजवळच्या बसस्थानकावर झोपलेले आढळले. त्यामुळे पालकांसोबत पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.
प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. १३ वर्षांची मुलगी आणि १५ वर्षांचा मुलगा यांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू झाले. घरच्यांची सारखी नजर असल्याने त्यांना सलग भेटता, बोलता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘चल कही दूर निकल जाये’चा निर्णय घेतला. त्यानुसार, बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ते पळून गेले. हा प्रकार सायंकाळी पालकांच्या लक्षात आला. त्यामुळे दोघांच्याही पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
ठाणेदार उमेश बेसरकर आणि सहकाऱ्यांनी एकीकडे, तर दुसरीकडे दोघांच्या पालकांनीही स्वतंत्र शोधमोहीम सुरू केली. आज पहाटेच्या वेळी हे दोघे गावालगतच्या एका बसस्थानकावर झोपलेले आढळले. रात्रभराच्या कडाक्याच्या थंडीने त्यांचा प्रेमज्वर कधीचाच पळून गेला होता. पालकांनी ताब्यात घेतल्यानंतर दोघेही मुकाट्याने आपापल्या घरी निघून गेले. दरम्यान, हे दोघे सुखरूप मिळाल्याने पालकांसोबत पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.
----