राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यामध्ये अनेक सामाजिक संस्था पाणपोई सुरू करतात. त्यामुळे सोबत पाणी न घेता घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना तहान भागविण्यासाठी जास्त भटकंती करावी लागत नाही. त्यांना कोणत्याही ठिकाणी सहज पाणी मिळून जाते. अशी सोय मूक प्राण्यांसाठीही करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेता अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच या संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड शाखांनी शहरात १५१ ठिकाणी पाण्याचे टाके ठेवण्याचा उपक्रम हातात घेतला आहे. आतापर्यंत विविध वस्त्यांमध्ये २५ टाके ठेवण्यात आले आहेत. टाके नि:शुल्क दिले जात आहेत.शरद मचाले, कुलभूषण डहाळे, नरेश मचाले, रमेश उदेपूरकर, अनंत शिवणकर व प्रकाश उदेपुरकर हे या उपक्रमाचे संयोजक आहेत. मूक प्राण्यांची सेवा हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे हा सेवाभाव जपण्याची मनातून इच्छा असणाऱ्यांनाच या संस्था टाके देत आहे. तसेच, संस्थांचे कार्यकर्ते वस्त्यावस्त्यांमध्ये फिरून इच्छुक व्यक्तीच्या घरापुढे टाके ठेवत आहेत. टाक्यात पाणी भरणे व टाक्याची नियमित सफाई करणे ही जबाबदारी संबंधित व्यक्तीकडे सोपविली जात आहे. व्हॉटस् अॅप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाचा प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुलक सागर महाराज यांच्या जन्मदिवसापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड येथील शाखा कार्यालयापुढे पहिले पाण्याचे टाके ठेवण्यात आले. त्यानंतर रमणा मारोती, शेषनगर, तुळशीबाग, झेंडा चौक महाल, गणेशपेठ, बजाजनगर इत्यादी वस्त्यांमध्ये टाके देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी सिद्ध होत आहे. गायी, म्हशी, कुत्रे, बकºया इत्यादी मूक प्राणी टाक्यातील पाणी पिऊन तृष्णा तृप्त करीत आहेत.
-ते करताहेत मूक प्राण्यांची तृष्णातृप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:03 PM
अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच या संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड शाखांनी शहरात १५१ ठिकाणी पाण्याचे टाके ठेवण्याचा उपक्रम हातात घेतला आहे.
ठळक मुद्देपुलक जन चेतना मंचचा उपक्रमठिकठिकाणी ठेवले जाताहेत पाण्याचे टाके