लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रामटेक येथील औषध दुकानदार ऋषीकेश किंमतकर यांच्यासोबत सहा वर्षांचा मुलगा आणि एक व्यावसायिक अभियंता संदीप महाजन असे तिघे जण कारने पारशिवनीहून रामटेककडे येत होते. आमडी फाट्यावरील ओव्हरब्रीजच्या बाजूने त्यांनी गाडी वळविली. पाऊस येऊन गेल्याने रस्त्यावर पाणी होते. अंदाज आला नाही, गाडी काचांपर्यंत पाण्यात बुडाली. दारही उघडेना. अखेर जवळच असलेल्या लोकांच्या मदतीने तिघेही खिडकीच्या काचांतून बाहेर पडले आणि दैव बलवत्तर म्हणून बचावले. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ च्या दरम्यान घडली.
रामटेक येथे गांधी चौकात ऋषीकेश किंमतकर यांचे मेडिकल स्टोअर्स आहे. ऋषीकेश सोमवारी काही कामानिमित्त पारशिवनी येथे गेले होते. सोमवारी रामटेक व पारशिवनी तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे नदीनाले भरून वाहत होते. अशातच ऋषीकेश त्यांच्या गाडीने आमडी फाट्यावर आले. त्यांनी ओव्हरब्रीजच्या बाजूच्या रस्त्याने गाडी रामटेककडे वळविली. रस्त्यावरून पाणी वाहत होते. गाडी उंच असल्याने निघून जाईल असा त्यांचा अंदाज होता परंतु तो चुकला. गाडी रस्त्याच्या मध्यभागी येताच खिडकीच्या काचापर्यंत पाणी पोहचले. काचेतून पाणी गाडीत शिरले व दुसऱ्या बाजूच्या काचेतून वाहू लागले. गाडी अनियंत्रित होत असल्याचे ऋषीकेश यांच्या लक्षात आले. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दारही उघडेना. अखेर ते तिघेही खिडकीतील काचांमधून बाहेर पडले. हे होत असताना शेजारीच आमडी फाट्यावर उभे असलेल्या काहींनी त्यांना बाहेर येण्यास मदत केली.