उमरेड : कोरोनाबाधित म्हटले की सर्वांचीच घाबरगुंडी उडते. अशाही परिस्थितीत विशिष्ट नियमावली पाळत काळजी घेतली तर निश्चितच कोरोनाबाधितांचा आत्मविश्वास आणि हिंमत वाढविण्याचे सेवाकार्य घडू शकते. उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये स्थानिक डॉक्टरांनी गत तीन ते चार आठवड्यांपासून कोरोनाग्रस्तांना योगा, व्यायाम आणि त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. केवळ पैसा कमविणे हेच वैद्यकीय क्षेत्राचे ब्रीद नाही, तर कोरोना महामारीच्या कठीण काळात समाजाप्रती थोडीफार बांधीलकी जपली पाहिजे, या सकारात्मक विचाराने अनेक डॉक्टर सेवाकार्य करीत आहेत. यांपैकीच एक डॉ. गौरीशंकर उरकुडे यांनी नि:शुल्क सेवाकार्याचा दृढनिश्चय करीत रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे लक्ष्य यशस्वीपणे साध्य केले. डॉ. उरकुडे यांनी रूपेश वंजारी या तरुणाला सोबतीला घेत ही किमया साधली. बहुसंख्य कोरोना रुग्णांना याचा लाभ झाला. रुग्णांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. दोघांच्याही या नि:शुल्क कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. गौरीशंकर उरकुडे यांनी उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये अशा पद्धतीने प्रयोग करावयाची इच्छा सामाजिक कार्यकर्ते मनीष शिंगणे यांच्याकडे व्यक्त केली. दोघांनीही तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे विषय मांडला. यास संमती मिळाली. तालुका आरोग्याधिकारी डॉ. संदीप धरमठोक आणि ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. एस. एन. खानम यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
अशी केली रुग्णसेवा
सकाळी ५.३० ते सात वाजेपर्यंत कोविड सेंटरवर जाऊन डॉ. गौरीशंकर उरकुडे व रूपेश वंजारी यांनी रुग्णांना आसन, व्यायाम यांसह ध्यान याकडे ध्यानाकर्षित केले. करुणाध्यान याकडेही लक्ष वेधले. श्वसनासंबंधी संपूर्ण बाबी समजावून सांगत आनंददायी वातावरणनिर्मिती साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या कार्यात रिता उरकुडे, डॉ. सुनिता निंबार्ते, डॉ. स्वप्निल सहारकर, निवेदिता निशाणे, आदींनीही सहकार्य केले.
-
प्रत्येक कोविड सेंटरमध्ये हा प्रयोग केला जाऊ शकतो. आयुष मंत्रालय अंतर्गत शासन-प्रशासनाने हे पाऊल उचलल्यास आणि अंमलबजावणी केल्यास नक्कीच सकारात्मक रिझल्ट मिळू शकतो.
- डॉ. गौरीशंकर उरकुडे, उमरेड