लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेमसंबंधातील अपयशातून एका प्रेमीयुगुलाने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ओढणीने एकमेकांचे हात बांधून आत्महत्या करणाऱ्या या प्रेमीयुगुलाचे मृतदेह बुधवारी सकाळी सापडले. केतन विनोद म्हेत्रे (२३) रा. बिनाकी मंगळवारी आणि भारती मोती केळवदकर (१७) रा. शांतिनगर अशी मृतांची नावे आहेत.बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दोघांचे मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आले. परिसरातील सोनू वाडवे याने पोलीस नियंत्रण कक्षास सूचना दिली. नियंत्रण कक्षाच्या सूचनेवर अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लगेच अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दोघांचेही हात एकाच ओढणीने बांधलेले होते. केतनचा उजवा तर भारतीचा डावा हात ओढणीने बांधला होता. पोलिसांनी केतनच्या खिशाची तपासणी केली. तेव्हा त्यात मोबाईल सापडला. परंतु त्यात सीम कार्ड नव्हते. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यासाठी मोबाईलच्या आयएमआय नंबरच्या आधारावर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. परिसरातील नागरिकांचीही विचारपूस केली. सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आली. परंतु त्यांचा कुठलाही पत्ता लागली नाही. नंतर मृतदेह मेडिकलला पाठवण्यात आले. दरम्यान केतनच्या आयएमआय नंबरच्या आधारावर पोलिसांना त्याच्या वडिलांचे नाव माहिती झाले. तो मोबाईल केतनचे वडील विनोद म्हेत्रे यांच्या नावावर होता. त्यांच्याशी संपर्क केले असता केतन घरातून गायब असल्याची माहिती मिळाली. मृतदेहाचा फोटो दाखवल्यावर त्यांच्या वडिलांना ओळख पटवली. त्यांच्याकडूनच भारतीच्या घरच्यांचीही माहिती मिळाली. भारतीचे कुटुंबीय सुद्धा ठाण्यात पोहोचले. असे सांगितले जाते की, केतन आणि भारतीमध्ये मैत्री होती. केतन हा उनाड मुलगा होता. भारतीने शिक्षण सोडले होते. दोघांचीही आर्थिक परिस्थिती चांगली नाही. चार-पाच महिन्यांपूर्वी सुद्धा केतन भारतीला घेऊन पळाला होता. काही दिवसानंतर ती परत आली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ती पुन्हा गायब होती.भारती बेपत्ता असल्याची तक्रार करण्यासाठी तिचे कुटुंबीय शांतिनगर पोलीस ठाण्यात गेले होते, परंतु तक्रार दाखल झाली नाही. दोघांनीही मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्रेमसंबंधात अपयश आल्याने दोघांनीही आत्महत्या केल्याचा संशय आहे. परंतु त्यांच्या कुटुंबीयांकडून प्राथमिक तपासात आत्महत्येचे कुठलेही ठोस कारण माहिती होऊ शकले नाही. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.