लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे शहरात एक भीषण हत्येची घटना टळली. दरम्यान, हत्येची सुपारी घेऊन सामानाची जमवाजमव करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ते लक्षात येताच हत्येचा कट रचून सुपारी देणारे फरार झाले.
उत्तर नागपुरातील गुन्हेगारांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खुनी संघर्ष सुरू आहे. वर्चस्वासाठी एकमेकांवर हल्ले करणे, त्यांची सुपारी देण्याचे प्रकारही नेहमीचाच भाग आहे. हत्येचेही प्रयत्न झाले आहे. मध्यंतरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी खास मोहीम राबवून कुख्यात गुन्हेगारांना धडकी भरविली. त्यामुळे अनेक गुन्हेगार शांत होते. आता त्यांनी पुन्हा डोके वर काढणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर, एका टोळीने दुसऱ्या टोळीतील एकाची हत्या करण्याची सुपारी पक्की केली. बाहेरगावचे गुन्हेगार बोलवून गेम वाजविण्याचा कट रचण्यात आला. त्यानुसार, पिस्तूल, मॅगझिन, काडतूसं बोलवून घेण्यात आली.
सुपारी किलर बोलवून गेम करण्याचे कटकारस्थान शिजत असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या युनिट पाचला लागली. त्यावरून पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद साळुंखे यांनी टिपू सुलतान चाैकात अब्बास अलीच्या घरी भाड्याने राहणारा मोहम्मद आफताब मोहम्मद असलम (वय २२) याच्या घरी ९ मार्चला छापा घातला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल तसेच मॅगझिन आणि ६ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या कारवाईची भनक लागताच हत्येचा कट रचणारे मास्टर माईंड फरार झाले.
कुणाचा होणार होता गेम?
विशेष म्हणजे, हत्येचा कट कुणी रचला आणि कुणाची हत्या केली जाणार होती, त्याची पोलिसांना माहिती आहे. मात्र, उगाच दहशत पसरू नये, गुन्हेगार सतर्क होऊ नये म्हणून पोलिसांनी याबाबत गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, सुपारी किलिंगचा कट रचणारे अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती उघड होऊ शकते, असा दावा पोलिसांनी केला आहे. युनिट पाचचे वरिष्ठ निरीक्षक मुकुंद साळुंखे यांच्या नेतृत्वात एपीआय संकेत चाैधरी, पीएसआय संतोष इंगळे, अंमलदार दीपक कारोकर, दिनेश चाफलेकर, चंदू ठाकरे, अनिल बावणे, आशिष देवरे, जितेंद्र दुबे, सुनील वानखेडे, साईनाथ दब्बा, उत्कर्ष राऊत, नासिर शेख, विकास चहांदे आणि गोपाल यादव हे आरोपींचा शोध घेत आहेत.