- सात गुन्हे उघड
- दागिने, रोख, मोबाईल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तीच्या अंगावरचे दागिने आणि मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या दोन नराधमांना तहसील पोलिसांनी अटक केली. गणेश उत्तम डेकाटे (वय २४, रा. पार्वतीनगर, कळमना) आणि छत्रपाल किशोर सोनकुसरे (वय २५, जुनी मंगळवारी, ढिवर मोहल्ला, लकडगंज) अशी या दोघांची नावे आहेत.
त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल दुचाक्या आणि अन्य चीजवस्तू असा एकूण तीन लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गोधनी येथील अंजली गिरजाप्रसाद तिवारी यांच्या वडिलांचा १ एप्रिलला इस्पितळात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी दुःखवियोगामुळे तिवारी यांच्याजवळचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही. नंतर मात्र वडिलांचा मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने अंजली यांनी सोमवारी (१७ मे) तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार जयेश भांडारकर यांनी गुन्हा दाखल करून तातडीने चौकशी सुरू केली. गुन्हा घडून दीड महिना झाला होता. त्यामुळे आरोपी बिनधास्त होते. त्यांनी मृत तिवारी यांच्या मोबाईलचा वापर सुरू केला होता. त्याचे लोकेशन कुही परिसरात दिसल्याने तहसील पोलिसांनी आरोपी डेकाटे आणि सोनकुसरे यांना सोमवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल जप्त केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता पोलीस चक्रावलेच. आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मोबाईल, सोन्याचे दागिने, रोकड, आठ लेडीज घड्याळे तसेच रुग्णालयात वापरले जाणारे साहित्य आढळले. त्यामुळे पोलिसांची शंका बळावली. डेकाटे आणि सोनकुसरे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्यांना बाजीरावचा हिसका दाखविला. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली. आरोपी डेकाटे आणि सोनकुसरे हे कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयात प्लास्टिक किटमध्ये पॅक करण्याचे काम करायचे. मृतदेह ताब्यात येताच हे दोघे दागिने तसेच मोबाईल, रोख रक्कम काढून घेत होते. त्यानंतर मृतदेह स्मशानात रवाना केला जायचा. संबंधित व्यक्तीचे नातेवाईक शोकमग्न असल्यामुळे या नराधमांचे दुष्कृत्य कुणाच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे ते मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करीत होते. त्यांनी अशा प्रकारे सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
---
कोरोना किटही चोरले
हे दोघे रुग्णालयातील कोरोना किट तसेच अन्य साहित्याचीही चोरी करायचे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण तीन लाख, ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अशा प्रकारची नागपुरातील अलीकडची ही पहिलीच कारवाई असून अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी आणि एसीपी थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जयेश भांडारकर, द्वितीय निरीक्षक बलरामसिंग परदेसी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल वाघ तसेच कर्मचारी लक्ष्मण शेंडे, शैलेश दाबोले, किशोर गरवारे, नजीर शेख, शंभुसिंग किरार, पंकज डबरे, यशवंत डोंगरे, कृष्णा चव्हाण, गगन यादव आणि अश्विनी यांनी ही कामगिरी बजावली.
----