लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी जाहीरनामा आहे. त्यांच्यासाठी जाहीरनामा केवळ एक कागद आहे. त्यांना माहिती आहे की, निवडून येणार नाही. त्यामुळेच ते वाट्टेल ती आश्वासने देऊ शकतात. उद्या राहुल गांधी हेदेखील आश्वासन देतील की, मी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.. नागपुरात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
यावेळी फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय संकल्पपत्राबाबत सविस्तर माहिती दिली. २०१९ मध्ये भाजपने ७५ आश्वासने दिली होती व ती सगळी पूर्ण करण्यात आली. भाजपचे संकल्पपत्र कागदी नाही, ती मोदींची गॅरंटी आहे. विशेष म्हणजे जेवढ्या सरकारी जागा रिकाम्या आहेत त्या सर्व भरण्यावर भर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसला ओबीसींवर बोलण्याचा अधिकारच नाहीकाँग्रेस सरकारने ७० वर्षे ओबीसींसाठी संवैधानिक आयोग नेमला नाही. तो आम्ही नेमला. सर्वांत जास्त ओबीसी मंत्री या मंत्रिमंडळात आहेत. राज्यात तर ओबीसी मंत्रालय तयार झाले. काँग्रेसला ओबीसींच्या मुद्यावर बोलण्याचा अधिकारच नाही, असेही फडणवीस म्हणाले.
महिलांना अधिकार मिळतील देशात समान नागरी कायदा लागू व्हावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते. संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येदेखील ते नमूद होते. देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे महिलांना अधिकार मिळतील, असा दावा फडणवीस यांनी केला.
भाजप संविधान बदलेल हा काँग्रेसचा जुमलामागील १० वर्षे भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. मात्र, आमच्या कुठल्याही नेत्याने संविधान बदलण्याचा विचार केला नाही, तर त्याचे रक्षण केले. भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलले जाईल हा काँग्रेसचा जुमला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.