नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतीत गंधगुटी विहारातील ७४ वर्षीय भंतेंच्या समयसूचकतेमुळे दानपेटी फोडण्यासाठी आलेला चोर पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी चोराला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
जागृत नगर येथे हे विहार असून, भंते मेधनकर हे मागील चार वर्षांपासून तेथील जबाबदारी सांभाळतात. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर सव्वाअकराच्या सुमारास भंते झोपायला गेले. मध्यरात्रीनंतर त्यांना अचानक भांडी पडल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी लगेच उठून आवाज कसा काय आला, याची पाहणी सुरू केली. विहारातील दानपेटीजवळ कुणीतरी उभे असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आवाज दिला असता, त्या इसमाने बारूमच्या दिशेने पळ काढला. भंतें न घाबरता बाथरूमजवळ गेले व त्यांनी बाहेरून कडी लावली.
त्यांनी तातडीने वस्तीतील ईश्वर गौर व राज चौधरी यांना आवाज दिला. त्यांनी पोलिसांना फोन करून बोलविले. चौकशीत चोराचे नाव अनिकेत चंद्रशेखर कोचे (२४, धम्मदीपनगर) असल्याची बाब स्पष्ट झाली. चोराने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याअगोदरच आवाज झाल्याने तो अयशस्वी ठरला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, अनिकेत कोचेची दुचाकीदेखील जप्त केली आहे. वयाच्या ७४ व्या वर्षीदेखील समयसूचकता दाखविणाऱ्या भंते मेधनकर यांच्यामुळेच दानपेटी वाचू शकली.