लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद झाल्याने लोकं त्रस्त आहेत. मोलमजुरी करून कमावणारा कष्टकरी वर्ग तर सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. अशात चोरट्यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून बँकेतील सर्व रक्कम पळवली. पण चोरट्यांचा नंबर मिळाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना असे काही सुनावले, आपल्या बिकट परिस्थितीबद्दल असा हंबरडा फोडला की चोरट्यांनाच पाझर फुटला आणि चोरट्यांनी चोरलेल्या रकमेचा अर्धा भाग पीडित व्यक्तीच्या खात्यात पुन्हा टाकला.पीडित व्यक्तीचे नाव प्रमोद सिंग असून, तो वाडी परिसरात राहतो. त्याच्याकडे मालवाहतूक करणारा मिनी ट्रक आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे बंद पडले आहे. प्रमोद सिंग मिनी ट्रकचा फास्टटॅग रिन्यू करीत असताना चोरट्यांनी त्याच्या बँक खात्यामधुन १५ हजार रुपये दुसऱ्या खात्यामध्ये वळविले. त्यापुर्वी चोरट्यांनी प्रमोद सिंह यांना एका बँकेची फास्टटॅग रिन्यू करण्याची खोटी लिंक ऑनलाईन पाठवून सर्व बँकींग डिटेल मिळविले. नंतर एका दुसऱ्या लिंकने प्रमोद यांच्या मोबाईलला काही वेळेसाठी हँग करून बँक खात्यातून सर्वच्या सर्व १५ हजार रुपये लंपास केले.लॉकडाऊनच्या काळात कामधंदे बंद, वाहन घरासमोर उभे, बँकेचे हप्ते कसे भरावे, कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न प्रमोद सिंग याच्यापुढे ठाकला. त्याने लगेच पोलीस स्टेशनला धाव घेतली. पण पोलीसांनी त्याला सायबर सेलकडे जाण्यास सांगितले. अखेर प्रमोद यांनी स्वत:च चोरांना जाब विचारण्याचे ठरविले. त्याला ज्या नंबरवरून लिंक आली होती. त्यावर कॉल करणे सुरू केले. अनेक कॉल केल्यानंतर समोरुन कोणतेही उत्तर आले नाही. मात्र प्रमोदने चोरट्यांचा पिच्छा सोडला नाही. तो सतत कॉल करीत राहिला. अखेरीस चोराने कॉल उचलला आणि प्रमोद सिंग यांनी आपली व्यथा सांगत चोरट्यांना चांगलेच सुनावले. चोरट्यांना सुनावत असतानाच त्याने हंबरडाच फोडला. प्रमोद सिंह यांची व्यथा आणि त्याचे रडणे ऐकून अखेर चोरांनाही पाझर फुटला. त्यांनी प्रमोदला धीर देत पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. आणि खरोखर फोन ठेवताच प्रमोद सिंह यांच्या बँक खात्यामध्ये चोरट्यांनी ८ हजार रुपये पाठविले.
अन् चोरट्याला फुटला पाझर; पीडिताने हंबरडा फोडल्याने परत केले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 9:56 PM
चोरट्यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून बँकेतील सर्व रक्कम पळवली. पण चोरट्यांचा नंबर मिळाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना असे काही सुनावले, आपल्या बिकट परिस्थितीबद्दल असा हंबरडा फोडला की चोरट्यांनाच पाझर फुटला आणि चोरट्यांनी चोरलेल्या रकमेचा अर्धा भाग पीडित व्यक्तीच्या खात्यात पुन्हा टाकला.
ठळक मुद्देऑनलाईन झाली होती फसवणुक