नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील एका मोठ्या खासगी बँकेचे एटीएम फोडण्यासाठी एक भामटा आतमध्ये शिरला. आतमधील रोकड काढण्यासाठी त्याने एटीएम मशीनची तोडफोड सुरू केली. हा सर्व गैरप्रकार बँकेची सर्व्हिलन्स टीम मुंबईतून कॅमेऱ्यात बघत होती. धोका लक्षात घेऊन त्यांनी तेथून तात्काळ स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षात माहिती दिली. नियंत्रण कक्षाने संबंधित भागातील पोलिसांना कळविले. त्यामुळे पोलिसांचे पथक लगेच एटीएमकडे धावले. पोलिसांची चाहूल लागल्यामुळे की काय आरोपी तेथून सटकला. त्यामुळे बँकेचे एटीएम आणि त्यातील रक्कम वाचली. काहीशी सिनेमातील प्रसंगासारखी वाटणारी ही घटना नागपुरात घडून आता चार दिवस झाले. मात्र बँक प्रशासनाने अद्यापही पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली नाही. त्यामुळे ही घटना सतर्कता आणि दुर्लक्षिततेचा नमुना ठरली आहे.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी ही घटना घडली. टेकानाका चौकाजवळ अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. एटीएम फोडून त्यातील रक्कम काढण्याचे कलुषित मनसुबे घेऊन एक भामटा रविवारी पहाटे ३ च्या सुमारास एटीएममध्ये शिरला. त्याने एटीएम मशीन फोडण्याचे प्रयत्न सुरू केले. बँकेच्या मुंबई मुख्यालयातील सर्व्हिलन्स टीमला आपले एटीएम फोडले जात असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी लगेच नागपूरच्या पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून ही माहिती कळविली. नियंत्रण कक्षाने कपिलनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. कपिलनगर पोलीस पथक लगेच एटीएमच्या दिशेने धावले. दरम्यान, सतर्क भामटा पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहून तेथून पळून गेला. पोलिसांनी नंतर बँकेच्या व्यवस्थापकाला एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळविली. बँक प्रशासनाने त्याबाबत फारसे गांभीर्य दाखवण्याची तसदी घेतली नाही. आपले दैनंदिन व्यवहार एटीएममधून जैसे थे सुरू ठेवले. आता या घटनेला चार दिवस झाले आहेत. परंतु अद्यापही बँक व्यवस्थापनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार आलेली नाही. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेºयात एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी कैद झाला आहे. पोलिसांकडून तक्रार मिळाल्यास गुन्हा दाखल करून पोलिस त्याचा शोध घेऊ शकतात. त्यामुळे त्या गुन्हेगाराकडून पुढे अशा प्रकारच्या किंवा दुसऱ्या कोणत्या घडू शकणाºया गुन्ह्याला आळा बसू शकतो; मात्र बँक व्यवस्थापनाकडून अद्यापही तक्रार न मिळाल्यामुळे पोलिसही हतबल झालेले आहेत. या घटनेतून बँकेच्या मुंबईतील सर्व्हिलन्स टीमची सतर्कता आणि याच बँकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा अधोरेखित झाला आहे.तक्रारच नाही, कारवाई कशी होणार!यासंबंधाने कपिलनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार मते त्यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेबाबत विचारणा केली असता त्यांनी घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. कारवाईबाबत बोलताना त्यांनी बँक व्यवस्थापनाकडून अद्यापही आपल्याकडे तक्रार आली नसल्याचेही सांगितले.-----