उमरेड (नागपूर) : उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील गजभिये एचपी गॅस ग्रामीण वितरक एजन्सीच्या गोदामात असलेले सिलिंडर चोरट्यांनी पळविले. एकूण तब्बल १५२ सिलिंडर १ जुलै रोजी मध्यरात्री चोरट्यांनी पळवून नेले. मकरधोकडा येथील नूतन गजभिये यांच्या नावाने ही एजन्सी असून, त्यांना ४ लाख २७ हजार रुपयांचा फटका बसला. १५२ सिलिंडरपैकी ३९ सिलिंडर हे भरलेले, तर ११३ सिलिंडर हे रिकामे होते.
मकरधोकडा येथे नूतन गजभिये यांची सिलिंडर पुरवठा करणारी एजन्सी आहे. एकूण ग्राहक संख्या २ हजारांच्या आसपास असून, सभोवताल असलेल्या गावखेड्यात घरोघरी सिलिंडर पोहोचविण्याची व्यवस्था त्यांच्यामार्फत केली जाते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉककरिता निघाले असताना, त्यांना चोरीची बाब लक्षात आली.
चोरट्यांनी गॅस सिलिंडरसह गॅस शेगड्या, हाउस पाइप, रेग्युलेटर, कॅमेऱ्याचे डीव्हीआर आदी साहित्यही लंपास केले. उमरेड पोलीस ठाण्यात ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे करीत आहेत. तक्रार दाखल होताच, घटनास्थळी श्वानपथक बोलविण्यात आले. फ्रिंगर प्रिंट घेण्यात आले.