लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन फोडून आतील १५ लाख १० हजार २०० रुपये रोख लंपास केली. ही घटना कुही शहरात मंगळवारी मध्यरात्री घडली असून, बुधवारी सकाळी उघडकीस आली.कुही शहरात विविध बँकांसह भारतीय स्टेट बँकेचेही काही एटीएम आहेत. यातील एका एटीमला चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यात चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने मशीनचा काही भाग कापला आणि रोख रक्कम ठेवण्याचे ‘ट्रे’ बाहेर काढून त्यातील संपूर्ण रक्कम चोरून नेली. त्या एटीएम मशीनच्या खोलीत एकूण तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातील दोन कॅमेऱ्यांवर चोरट्यांनी शाईसदृश द्रव्याची फवारणी केली होती. एक सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत होता. एक बुरखाधारी चोर आणि स्कोडा कार त्या कॅमेऱ्यात कैद झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.ही घटना मध्यरात्री घडली असून, दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे लगेच पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांसह बँक अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय, ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, तूर्तास चोरट्यांबाबत ठोस पुरावा पोलिसांना मिळू शकला नाही. चोरट्यांनी या एटीममधून एकूण १५ लाख १० हजार २०० रुपये लंपास केल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. शिवाय, गॅस कटरच्या उष्णतेमुळे मशीनचेही मोठे नुकसान झाल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी कुही पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके करीत आहेत.सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर कुही शहरातील तालुक्यातील काही महत्त्वाच्या व मोठ्या गावांमध्ये विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम आहेत. त्या संपूर्ण एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी खासगी सुरक्षा एजन्सीकडे सोपविण्यात आली आली आहे. तालुक्यातील कोणत्याही एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. शिवाय, बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असले तरी, त्यातील काही कॅमेरे बंद आहेत. कार्यरत असलेल्या कॅमेऱ्यांवर चोरटे आधीच शाईसारखे द्रव्य लावत असल्याने किंवा फवारत असल्याने चोरी झाल्यानंतर पोलिसांना फारसे ठोस पुरावे मिळत नाही. एकंदरीत, बहुतांश एटीमची सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास येते.
चोरट्यांनी एटीएम फोडले : १५ लाख रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 11:35 PM
चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन फोडून आतील १५ लाख १० हजार २०० रुपये रोख लंपास केली. ही घटना कुही शहरात मंगळवारी मध्यरात्री घडली असून, बुधवारी सकाळी उघडकीस आली.
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्याच्या कुही येथील घटना