नागपूर : भरदिवसा दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून एका वृद्धेच्या अंगावरील दागिने लुटत पळ काढला. या प्रकारामुळे वृद्धेला धक्का बसला व भितीमुळे तिच्या तोंडातून शब्ददेखील फुटू शकले नाही. बराच तास ती एकाच जागेवर पडून राहिली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली व यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
चंद्रकला मधुकर उईके (६०, जाटतरोडी) असे संबंधित महिलेचे नाव आहे. मंगळवारी त्यांची दोन्ही मुले, सुना कामावर निघून गेले. तर पती वीजेचे देयक भरण्यासाठी दुपारी १२ वाजता बाहेर गेले. चंद्रकला या घरीच होत्या व दरवाजा लोटून बसल्या होत्या. अडीच वाजताच्या सुमारास दोन जण दरवाजा उघडून आत आले व त्यांनी पतीने आदल्या दिवशी किती पेंशन घरी आणली अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने चंद्रकला यांचे मंगळसूत्र व कर्णफुले असे सुमारे ३५ हजारांचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्यांनी चंद्रकला यांना धमकी देत धक्का दिला.
चंद्रकला यांना मधुमेह असून या प्रकारामुळे त्या दहशतीत आल्या. त्यांच्या गळ्यातून आवाजदेखील निघू शकला नाही व पायात त्राणच उरले नाही. त्या बरेच तास एकाच जागी झोपून होत्या. सायंकाळी कुटुंबिय घरी आल्यावर ही घटना समोर आली. चंद्रकला यांना घेऊन कुटुंबियांनी इमामवाडा पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.