लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि दोन हातघड्याळे असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यापासून प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली.
रवीनगरातील शासकीय वसाहतीत ए-९-१ क्रमांकाच्या निवासात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी गरिमा नारायण बागडोदिया (वय ४०) राहतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी त्या न्यायालयात कर्तव्यावर गेल्या. इकडे निवासस्थानाच्या मागच्या दाराच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले आणि त्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून अंगठी तसेच सोन्याचे दागिने आणि दोन हातघड्याळे असा एकूण १ लाख, ७७ हजारांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजता दरम्यान फिर्यादी घरी परतल्या तेव्हा ही घटना उघडकीस आली. माहिती कळताच अंबाझरीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चोरट्याचा शोध लावण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांचे पथकही बोलवून घेतले. श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंतचा मार्ग दाखवला. दरम्यान, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याचे कळताच एकच खळबळ निर्माण झाली. पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चोरीच्या घटनेची माहिती घेऊन तपासासंदर्भात मार्गदर्शन केले.
---
चाैकीदार नाही अन् सीसीटीव्हीही नाही
प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेने बरेच मुद्दे उजेडात आणले आहे. या वसाहतीत अनेक उच्च अधिकारी, न्यायदंडाधिकारी तसेच अन्य महत्त्वाचे व्यक्ती वास्तव्याला आहे. मात्र, इकडे चाैकीदार अथवा सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे या चोरीच्या घटनेच्या निमित्ताने उघड केले आहे.
----