नागपूर : घरमालक बाहेरगावी गेल्याचे पाहून अज्ञात आरोपींनी घरफोडी करून दागीने, रोख रक्कम असा ५.८४ लाखांचा मुद्देमाल पळविला. या घटना लकडगंज आणि मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
पहिल्या घटनेत लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ एप्रिलला रात्री नऊ वाजता ते ३० एप्रिलच्या सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान योगेश देविदास वाधवानी (४२, सतनामीनगर, आंबेडकर चौक) हे आपल्या घराच्या दाराला कुलुप लाऊन परिवारासह वृंदावन मथुरा येथे देवदर्शनासाठी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप, कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील आलमारीचे लॉकर तोडून त्यातील सोने-चांदीचे दागीने व रोख ३५ हजार असा एकुण ३ लाख ७७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दुसऱ्या घटनेत मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३० एप्रिलला सकाळी ६ ते १ मे रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान दर्शन आनंद छाजेड (३५, रतननगर) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह अमरावती येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लोखंडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागीने, लॅपटॉप, टॅब, सोनी कंपनीचा कॅमेरा व रोख ८० हजार असा एकुण २ लाख ७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी लकडगंज आणि मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.