नागपूर : उन्हाळ्यानंतर शहरात घरफोड्यांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र दिवाळीच्या महिन्यात शहरात हा आकडा परत एकदा वाढला. एकाच महिन्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये २७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. विशेषतः सुट्यांमध्ये बाहेरगावी गेलेल्यांना जास्त फटका बसल्याचे दिसून आले. एकूणच चोरांची ‘दिवाळी’च झाल्याचे चित्र दिसून आले.
दिवाळीच्या कालावधीत अनेकजण कुटुंबासह बाहेरगावी नातेवाइकांकडे किंवा देवदर्शनाला जातात. यावेळी कितीही दक्षता घेतली तरी चोरट्यांच्या नजरा अशा घरांचा शोध घेतच असतात अन् संधी मिळताच ते त्यांना ‘टार्गेट’ करतात. उन्हाळ्यात नागपुरात घरफोड्यांची संख्या वाढली होती. मात्र त्यानंतर चार महिन्यांत घरफोड्यांच्या घटनांचा आकडा नियंत्रणात आला होता. सप्टेंबर महिन्यात ४८ घरफोड्यांची नोंद झाली होती. ऑक्टोबरमध्ये हा आकडा ६१वर गेला. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सुमारे ४० टक्के घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेले होते.
दहा महिन्यांत ५९० घरफोड्या
जानेवारी महिन्यापासून ते ऑक्टोबरपर्यंत शहरातच ५९० घरफोड्यांची नोंद झाली. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत सर्वाधिक घटनांची नोंद झाली. मे महिन्यात सर्वाधिक ८३ गुन्हे नोंदविले गेले होते. जुलै महिन्यात घरफोड्या बऱ्यापैकी नियंत्रणात आल्या व ४१ गुन्हे नोंदविले गेले.
हुडकेश्वर, बेलतरोडी ‘टार्गेट’
घरफोड्यांच्या जास्त घटना या शहराच्या सीमेवरील भागांमध्ये झाल्या आहेत. घरफोड्यांसंदर्भात हुडकेश्वरमध्ये सर्वाधिक १३ गुन्हे नोंदविण्यात आले. तर बेलतरोडी व अंबाझरीत अनुक्रमे ८ व ७ गुुन्ह्यांची नोंद झाली.
३५ टक्के गुन्ह्यांचाच उलगडा
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या घरफोड्यांपैकी केवळ दोन घरफोड्यांचाच उलगडा झाला, तर दहा महिन्यातील ५९० घरफोड्यांपैकी २०७ म्हणजे ३५ टक्के घरफोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. २०२१च्या तुलनेत यंदा घरफोड्यांचा आकडा घटला आहे. मागील वर्षी १० महिन्यात ६६१ घरफोड्या झाल्या होत्या. यंदा त्यात १०.७४ टक्क्यांनी घट झाली आहे. घरफोड्यांच्या अनेक घटनांत आरोपी हे जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या बाहेरील असतात. विशिष्ट टार्गेट ठेवून ते शहरात येतात व ते पूर्ण झाले की पुढील शहराकडे निघून जातात. अनेकजण हायटेक पद्धतीनेदेखील घरफोड्या करतात व त्यामुळे शेजारच्यांनादेखील घटना झाल्याचे कळत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महिनानिहाय घरफोड्या
महिना - घरफोड्या
जानेवारी - ५५
फेब्रुवारी - ६८
मार्च - ६५
एप्रिल - ६१
मे - ८३
जून - ५३
जुलै - ४१
ऑगस्ट - ५५
सप्टेंबर - ४८
ऑक्टोबर - ६१
पाचहून अधिक घरफोड्या
पोलीस ठाणे - गुन्हे
अजनी - ६
अंबाझरी - ७
बेलतरोडी - ८
गिट्टीखदान - ६
हुडकेश्वर - १३
जरीपटका - ५
कळमना - ६
वाडी - ६