आॅफिस बॉयसह तिघांना अटक : ३.५० लाख रुपये चोरीप्रकरण नागपूर : बिल्डरच्या कार्यालयातील आॅफिस बॉयने साथीदारांच्या मदतीने कार्यालयातील साडेतीन लाख रुपये चोरून नेले. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तिघांना अटक केली. आरोपींनी कार्यालयात शिरण्यासाठी ‘कुलर डक्ट’चा (हवा येण्याची जागा) वापर केला होता हे विशेष. शाहनवाज ऊर्फ सोनू अब्दुल जमील (२३) रा.अरविंदनगर, आकाश पुरुषोत्तम मौंदेकर (२६) रा. संजीवनी क्वॉर्टर आणि शाहरुख खान ऊर्फ राजा अब्दुल रशीद (२०) रा. गरीबनवाजनगर अशी आरोपीची नावे आहे. भालदारपुरा येथे हसन अली यांचे राज अॅण्ड राज कन्स्ट्रक्शन आहे. त्यांच्या कार्यालयात सोनू आॅफिस बॉय आणि वाहन चालक म्हणून काम करीत होता. १५ जानेवारी रोजी रात्री कार्यालयातील साडेतीन लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा यात ओळखीच्या व्यक्ती सहभागी असल्याचा संशय आला. पोलिसांना सोनूवर संशय आला. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो संशयास्पद युवकांसोबत राहत असल्याचे आढळून आले. या आधारावर त्याची विचारपूस करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी कठोरपणे विचारपूस केली तेव्हा त्याने आकाश व राजाच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. सोनूला कार्यालयात मजुरांना वाटप करण्यासाठी असलेली रक्कम ठेवली असल्याची माहिती होती. १५ जानेवारी रोजी रात्री तिघेही मोमीनपुरा येथे पोहोचले. सोनू मोमीनपुऱ्यातच थांबला तर आकाश आणि राजा कार्यालयात गेले. ते छतावर ठेवलेल्या कुलर डक्टमधून कार्यालयातील अकाऊंट सेक्शनमध्ये पोहोचले. सोनूने सांगितल्यानुसार ड्रावरमधून साडेतीन लाख रुपये चोरले. पोलिसांनी आकाश व राजलाही अटक केली. (प्रतिनिधी)
चोरांनी केला ‘कुलर डक्ट’चा वापर
By admin | Published: January 19, 2017 2:57 AM