ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 18 - बिल्डरच्या कार्यालयातील आॅफीस बॉयने साथीदारांच्या मदतीने कार्यालयातील साडे तीन लाख रूपये चोरून नेले. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावित तिघांना अटक केली. आरोपींनी कार्यालयात शिरण्यासाठी ‘कुलर डक्ट’चा (हवा येण्याची जागा) वापर केला होता हे विशेष. शाहनवाज उर्फ सोनू अब्दुल जमील (२३) रा.अरविंदनगर, आकाश पुरुषोत्तम मौंदेकर (२६) रा.संजीवनी क्वॉर्टर आणि शाहरुख खान उर्फ राजा अब्दुल रशीद (२०) रा. गरीबनवाजनगर अशी आरोपीची नावे आहे. भालदारपुरा येथे हसन अली यांचे राज अॅण्ड राज कंस्ट्रक्शन आहे. त्यांच्या कार्यालयात सोनू आॅफीस बॉय आइण वाहन चालक म्हणून काम करीत होता. १५ जानेवारी रोजी रात्री कार्यालयातील साडे तीन राख रूपये चोरट्यांनी चोरून नेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा यात ओळखीच्या व्यक्ती सहभागी असल्याचा संशय आला. पोलिसांना सोनूवर संशय आला. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो संशयास्पद युवकांसोबत राहत असल्याचे आढळून आले. या आधारावर त्याची विचारपूस करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पंरतू पोलिसांनी कठोरपणे विचारपूस केली तेव्हा त्याने आकाश व राजाच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले.सोनुला कार्यालयात मजुरंना वाटप करण्यासाठी असलेली रक्कम ठेवली असल्याची माहिती होती. मकर संक्रांतीमुळे बँक बंद असल्याने कार्यालयात मोठी रक्कम हमखास मिळेल, याची त्याला खात्री होती. १५ जानेवारी रोजी रात्री तिघेही मोमीनपुरा येथे पोहोचले. सोनू मोमीनपुºयातच थांबला. तर आकाश आणि राजा कार्यालयात गेले. ते छतावर ठेवलेल्या कुलर डक्टमधून कार्यालयातील अकाऊंट सेक्शनमध्ये पोहोचले. सोनुने सांगितल्यानुसार ड्राव्हरमधून साडे तीन लाखरूपये चोरले. पोलिसांनी आकाश व राजलाही अटक केली. त्याच्याकडून चोरलेले रूपये जप्त करण्यात आले. आकाश हा जनावरांच्या तस्करीतही सहभागी आहे. त्याच्याविरुद्ध मारहाण व जनावराच्या तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना ते पकडले जाणार नाहीत, याची खात्री होती. परंतु पोलिसांनी १२ तासातच त्यांना शोधून काढले. ही कारवाई डीसीपी संभाजी कदम, एसीपी अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल ताकसांडे, शरद चांभारे, अजय गिरडकर आणि आशीष बहाड यांनी केली.