लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: फेसबुकवर आपल्या व्यक्तीगत आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी शक्यतो सांगू नयेत, ऑनलाईन शॉपिंग करताना काय नियम पाळावेत किंवा इन्स्ट्राग्रामवर फोटो टाकताना कोणते फोटो टाकू नयेत याचे अवधान स्त्रियांनी कसे राखावे, याबाबत उद्बोधन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर पोलिस सायबर सेल तसेच महिला व बालकल्याण विभागाातर्फे शुक्रवारी करण्यात आले होते.सायबर सेफ वूमन या शीर्षकांतर्गत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय होते तर प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. संजीव कुमार, विभागीय आयुक्त, हेमराज बागूल, संचालक, माहिती व जनसंपर्क, डॉ. सुरेंद्र जिचकार, प्राचार्य, धनवटे नॅशनल कॉलेज, महेश माखिजा, सायबर तज्ज्ञ, सरिता कौशिक, ब्युरो चिफ, एबीपी माझा, अॅड. अंजली विटणकर, अॅड. स्मिता सिंगलकर, श्वेता खेडकर उपायुक्त सायबर व विशेष शाखा आदी होते. सायबर क्राईमचा अलिकडचा वाढता आलेख पाहता, याबाबत नागरिकांमध्ये विशेषत: स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज यात विशद करण्यात आली.सायबर सेफ्टी किंवा सायबर क्राईम यासंदर्भात, प्रश्न हा नेमका कुठे आहे हे शोधणं गरजेचं असल्याचं मत हेमराज बागूल यांनी व्यक्त केलं. आपण मुलामुलींच्या संगोपनात भेदभाव करतो. या प्रश्नाचं मूळ तिथंच रुजलं जातं. त्यामुळे मुलांचं संगोपन करताना त्यांच्यात संवेदनशीलता निर्माण करण्याची गरज अधिक आहे. आता बदलण्याची गरज मुलींना नाही तर मुलांना आहे. दुसरं म्हणजे आपल्या संस्थात्मक रचनांमध्येही याबाबत योग्य ते बदल घडून येण्याची गरज आहे, असे ते पुढे म्हणाले.महाराष्ट्र राज्य महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. नागपुरात रात्री दहानंतर एकटीने घरी जाणाºया स्त्रियांसाठी सुरू करण्यात आलेल्या होम ड्रॉप सोयीचा लाभ दररोज कित्येक स्त्रिया घेत असल्याचे ते पुढे म्हणाले. सायबर सेफ्टी ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. मुलींनीही आपली जबाबदारी जाणून घ्यावी व सोशल मिडियावर फोटो अपलोड करताना काळजी घ्यावी असे त्यांनी नमूद केले.बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपले शिक्षण तंत्रही बदलले आहे. त्याचे साईड इफेक्ट जाणवतात ते तंत्रज्ञानातील दोषामुळे नव्हे तर आपण त्याचा सदोष वापर करत असल्याने आहेत असे मत सुरेंद्र जिचकार यांनी मांडले. वॉटसअप किंवा फेसबुक ही संवादाकरिता निर्माण केलेली माध्यमे आहेत मात्र आपण त्यांचा वापर सोशल मिडियासारखा करत आहोत. त्यामुळे आपण आपली व्यक्तीगत स्वायत्तता जपली पाहिजे. तुम्ही कुठे आहात, काय करत आहात, जे जाणण्याचा अधिकार तुम्ही इतरांना देता कामा नये असे त्यांनी पुढे म्हटले.आपण कायमस्वरुपी सायबर सेफ राहू शकत नाही असे परखड मत सरिता कौशिक यांनी मांडले. आजच्या सायबरच्या वेगवान युगात ते शक्य नाही. मात्र सोशल मिडिया असो, आॅनलाईन शॉपिंग असो वा अन्य बाबी, आपण आपली सुरक्षितता जास्तीतजास्त कशी राखू शकतो यावर अधिक भर द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण आपले सायबर फूट प्रिंट या जगात किती सोडायचे याचे भान राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी पुढे म्हटले.यावेळी सायबर तज्ज्ञ महेश माखिजा यांनी विविध अॅप्स वापरताना काय काळजी घ्यावी याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी केले.