शरद पवार : शांतिवनातील बाबासाहेबांच्या वस्तूंची पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तथागत बुद्ध यांचा जागतिक शांतीचा संदेश व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीमध्ये रुजवून आपण पुढे वाटचाल करायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी शांतिवन येथे केले. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील प्रत्येक क्षणांचे साक्षी, त्यांनी वापरलेले साहित्य चिंचोली शांतिवन येथील संग्रहालयात आहेत. शरद पवार येथे दर्शन घेण्याकरिता आले होते. यावेळी त्यांनी संग्रहालयात ठेवण्यात आलेले आंबेडकर यांचे साहित्य, संविधान लिहिलेले टाईपराइटर, पेन, वृत्तपत्रे व कपडे आदींची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी चिंचोली बुद्धविहार येथील तथागत बुद्ध व आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तथागत बुद्धाचे जागतिक शांततेचे विचार आंबेडकरांनी कृतीमधून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविले पाहिजे. शांतिवन याचे प्रेरणादायी कें द्र ठरेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. आमदार प्रकाश गजभिये म्हणाले, चिंचोली गाव हे बाबासाहेबांच्या ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणारे आहे. दिवंगत वामनराव गोडबोेले यांनी या गावाची निवड केली. त्यांनी नागपूरकरांच्या भावनांचा आदर केला. आंबेडकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तयार झालेले शांतिवन हे जगाच्या नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही. शांतिवन विकासाचा ६५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी द्यावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूचे जतन करावे, अशी मागणी गजभिये यांनी केली. त्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. याप्रसंगी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल देशमुख, माजी मंत्री व ग्रामीण अध्यक्ष रमेश बंग, कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, राजाभाऊ टांकसाळे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रदेश संघटन सचिव विजय गजभिये, जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, शहराध्यक्ष दिनकर वानखेडे, महिला शहर अध्यक्ष अलका कांबळे, दिलीप पनकुले, चिंचोली संग्रहालयाचे संचालक संजय पाटील, उपसरपंच ईश्वर उबळे, शेखर गोडबोले, प्रकाश सहारे, प्रदीप लांबसोंगे, जयंता टेंभुर्णे, विलास सोनवणे, एनआयटीचे अधीक्षक अभियंता आर.के. पिंपळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बुद्ध व बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीमध्ये रुजवा
By admin | Published: May 28, 2017 2:11 AM