‘मन:शक्ती व स्मृती विकास’ वर व्याख्यान : चंद्रशेखर यांचे प्रतिपादन नागपूर : विचार आणि रोगाचा फार जवळचा संबंध आहे. डोक्यात जसा विचार येतो, तसा रोग होतो. तो रोग कोणत्याही औषधाने दुरुस्त होत नाही तर त्यासाठी ऊर्जा हवी असते. आत्मा ही एक शक्ती आहे. परमेश्वराकडून प्रत्येक मनुष्याला ती ऊर्जा मिळत असते. झोप, ध्यान व एकाग्रता या तीन माध्यमातून ती प्राप्त करता येत असल्याचे प्रतिपादन डॉ. बी. के. चंद्रशेखर यांनी केले. हृदय मित्र मंडळाच्यावतीने ‘मन:शक्ती व स्मृतीविकास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी हृदय मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश डोरले व सचिव अशोक नाफडे उपस्थित होते. धरमपेठ येथील राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयात, हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. चंद्रशेखर यांनी प्रोजेक्टर व प्रात्यक्षिकातून ऊर्जा कशी प्राप्त केली जाऊ शकते, ते सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, प्रत्येक मनुष्याच्या शरीरात सात ऊर्जा स्थाने असतात. परंतु तुमच्या डोक्यातील विचारानुसार त्यामधील ऊर्जा नष्ट होते. यामध्ये क्रोध व मोबाईल फोन हा सर्वांधिक धोकादायक असल्याचे ते म्हणाले. क्रोधामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा क्षणात नष्ट होते. त्यामुळे प्रत्येकाने क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे. दुसऱ्याविषयी द्वेष व इर्षेतून क्रोध निर्माण होतो. मात्र त्या क्रोधामुळे दुसऱ्यापेक्षा स्वत:लाच अधिक नुकसान होते. सोबतच सध्या मनुष्य आपल्या शेजाऱ्यापेक्षा स्वत:च्या मनापासून अधिक त्रस्त असतो. त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांची कालवाकालव सुरू असते. यातूनही ऊर्जा नष्ट होते. तुमचे आरोग्य तुमच्या हाती आहे.रोगाला कोणतेही औषध ठिक करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वत:च्या शरीरात ऊर्जा निर्माण करावी लागेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
जसा विचार, तसा रोग!
By admin | Published: September 28, 2014 1:05 AM