उमरेड : रेल्वे स्टेशनमागील झोपडपट्टी परिसरात झालेल्या खून प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सूरज सखाराम मांडले (३९, रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून ग्याना रूपराव शेंडे (२३, रा.रेल्वे झोपडपट्टी, उमरेड) याचा खून करण्यात आला होता. शुक्रवारी, १० सप्टेंबर रोजी नागरिकांच्या सतकर्तेपणामुळे सदर हत्याकांड उजेडात आले. या प्रकरणी पोलिसांनी सुरजित उर्फ गोलू सखाराम मांडले (३०) आणि विजेन उर्फ विजय उर्फ सुकळू धनराज करतुले (२२) या दोघांना अटक केली होती. या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना उमरेड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एका शिष्टमंडळाने जलद न्यायालयात प्रकरण चालवावे. तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. शिष्टमंडळात आदिवासी पारधी समाजाचे गणेश पवार, देसराज पवार, सुरेश भोसले, देवराव राजपूत, सुनंदा पवार, शर्मिंदा पवार आदींनी या विषयाकडे लक्ष वेधले आहे. उमरेड पोलीस ठाण्यात सदर प्रकरणाचा ३०२, २०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या आरोपीला अटक, १५ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:12 AM