नागपूर : कोरोनाबाधितांना सेवा देणाऱ्या इन्टर्न(आंतरवासिता)डॉक्टरांना ५० हजार रुपये मानधन देण्याच्या मुख्य व इतरही मागण्यांवर गुरुवारीसुद्धा तोडगा निघाला नाही. यामुळे मेयो, मेडिकलमध्ये इन्टर्न डॉक्टर तिसऱ्या दिवशीही संपावर होते. दोन्ही रुग्णालयाचे साधारण ३५० वर डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. संपाचा फटका रुग्णांना बसत असतानाही प्रशासन याला गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्या मुंबई व पुण्याच्या इन्टर्नना डॉक्टरांना मागील वर्षी ५० हजार रुपये मानधन मिळाले होते. ते इतरही इन्टर्न डॉक्टरांना देण्यात यावे, ही डॉक्टरांची मुख्य मागणी आहे. शिवाय, ३०० रुपये प्रति दिवस जेवण, प्रवास व प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात यावा, कोविड ड्युटीनंतर क्वारंटाईन होण्याची सोय करावी, आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने उचलावी, शासनाचे विमाकवच प्रदान करावे, आदी मागण्यांसाठी डॉक्टरांनी मंगळवारपासून संपाचे हे हत्यार उपसले आहे. गुरुवारी डॉक्टरांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना भेटायला गेले होते. परंतु त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. मेडिकल इन्टर्न डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. शुभम नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मागण्यांवर अद्यापही निर्णय झालेला नाही. यामुळे तिसऱ्या दिवशीही संप कायम आहे. आम्ही मागण्यांना घेऊन अडून बसलेलो नाही, आम्ही चर्चा करून तोडगा काढण्यास तयार आहोत, असेही नागरे म्हणाले.