नागपूर : वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या एका आदिवासी आश्रमशाळेमधील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला चौकीदार राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (५२) याच्याविरुद्धचे खटले निकाली काढण्यासाठी विशेष सत्र न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तिसऱ्यांदा मुदत वाढवून दिली आहे.
उच्च न्यायालयाने सुरुवातीला २६ ऑक्टोबर २०१८ रोजी हे दोन्ही खटले निकाली काढण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर पहिल्यांदा १७ डिसेंबर २०१९ पर्यंत, तर दुसऱ्यांदा ६ मे २०२० पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. परंतु, कोरोनासह विविध कारणांमुळे या मुदतीतही खटले निकाली निघू शकले नाही. परिणामी, तिसऱ्या वेळी सत्र न्यायालयाच्या विनंतीनुसार एक वर्ष मुदत वाढवून देण्यात आली आहे.
लांडगेविरुद्ध या दोन्ही प्रकरणांत यापूर्वीही वेगवेगळा खटला चालविण्यात आला होता. विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला एका खटल्यात ५ ऑक्टोबर २०१७ रोजी भादंविच्या कलम ३७६(२)(आय)अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावली होती, तर दुसऱ्या खटल्यामध्ये ११ जानेवारी २०१८ रोजी भादंविच्या कलम ३७६(ई) (बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती)अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली होती. या दोन्ही निर्णयांविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल करून सत्र न्यायालयामध्ये स्वत:चा बचाव करण्याची पूर्ण संधी मिळाली नाही, असा दावा केला होता. विधी सेवा प्राधिकरणाने बाजू मांडण्यासाठी पुरेसा अनुभव नसलेला व असक्षम वकील दिला. त्यामुळे योग्य बचाव करता आला नाही असे त्याने सांगितले होते. आरोपीच्या दाव्यात तथ्य आढळून आल्यामुळे उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचे दोन्ही निर्णय रद्द केले, तसेच दोन्ही प्रकरणांवर दोषारोप निश्चित करण्याच्या टप्प्यापासून नव्याने खटले चालविण्याचा आदेश दिला.
-----------------
अशी आहेत प्रकरणे
लांडगेने पीडित विद्यार्थिनींवर ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केले, असा आरोप आहे. दरम्यान, एका मुलीमुळे आरोपीच्या राक्षसी कृत्याला वाचा फुटली. त्यानंतर दुसरी मुलगीही धाडस दाखवून पुढे आली. त्यामुळे मुलींच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध तक्रारी नोंदविल्या.