रविवारी एकूण १७० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. परंतु ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याच्या घटना घडत आहेत. मागील तीन ते चार दिवसांपासून नागपूरला सातत्याने रेल्वे मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा होत असून, रविवारी तिसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात पोहोचली. यात चार टँकरमध्ये ६३.५४ मेट्रिक टन ऑक्सिजन होता. रविवारी या चार टँकरमधून एकूण १७० मेट्रिक टन ऑक्सिजन नागपूरला उपलब्ध झाला.
ऑक्सिजन घेऊन नागपुरात पोहोचलेली ही तिसरी रेल्वेगाडी आहे. यापूर्वी विशाखापट्टणम येथून २३ एप्रिल रोजी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस ७ टँकर ऑक्सिजन घेऊन पोहोचली होती. त्यातील ३ टँकर नागपूरला, तर उर्वरित ४ टँकर नाशिकला मिळाले होते. दुसरी रेल्वेगाडी शनिवारी ओडिशाच्या अंगुल येथून ऑक्सिजन घेऊन आली होती. त्यानंतर रविवारी रात्री २.३० वाजता पुन्हा ओडिशाच्या अंगुल येथून आलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून नागपूरला ६३.५४ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला आहे. रात्री आलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस प्लॅटफाॅर्म क्रमांक ८ वर थांबविण्यात आली. त्यानंतर रॅम्पच्या मदतीने चार टँकर उतरवून घेण्यात आले.
रविवारी जिल्ह्यात एकूण १७० मेट्रिक टन ऑक्सिजन आणण्यात आला. यापैकी जिल्ह्यातील ऑक्सिजन सप्लायर कंपन्यांना ६२ मेट्रिक टन, तर रुग्णालयांना ७२ मेट्रिक टन वितरित करण्यात आला. जगदंबा - १०, भरतीया - १०, आदित्य (हिंगणा) - १५, आदित्य (बुटीबोरी) - १५, विदर्भ - ६ आणि रुकमणी (हिंगणा) - ६ असे एकूण ६२ मेट्रिक टनचे वितरण करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - २६, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय - २०, शालिनीताई मेघे - ५, लता मंगेशकर - ६, अलेक्सीस - ४, आशा हॉस्पिटल (कामठी) - २, अवंती - ४, क्रीम्स -१, ऑरेंज सिटी - १, सुवरटेक - २ आणि व्होकार्ट - १ असे एकूण ७२ मेट्रिक टन वितरण करण्यात आले.
बॉक्स
३,३२२ रेमडेसिविर इंजेक्शन
रविवारी जिल्ह्यात ३,३२२ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाली. शासकीय वितरण आदेशानुसार त्यांचे वितरण करण्यात आले.