नागपूर : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या तिसऱ्या रुग्णांची नोंद सोमवारी नागपुरात झाली. विशेष म्हणजे, चार दिवसांतच पुन्हा एका रुग्ण आढळून आल्याने काळजी वाढली. या महिला रुग्णासोबत तिचेही पतीही कोरोनाबाधित असून दोघांवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. पतीच्या जनुकीय चाचणीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. मागील चार दिवसांपासून रोज २५वर रुग्णांची भर पडत आहे. सोमवारी पुन्हा २६रुग्ण आढळून आले. राज्यात रुग्णांची एकूण संख्या १६७ वर पोहचली आहे. नागपुरात आज नोंद झालेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण ही २९ वर्षीय महिला असून मनपाच्या हनुमानगर झोनमधील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार, ही महिला आपल्या पतीसह ७ डिसेंबर रोजी दुबईला गेली. २० डिसेंबर रोजी दोघेही दुबईवरून मुंबईला परतले. तेथून ते विमानाने नागपुरात पोहचले असता दोघांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. २१ डिसेंबर रोजी दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ‘एम्स’मध्ये दाखल केले. जुनकीय चाचणीसाठी दोघांचेही नमुने पाठविले असता आज पत्नीचा अहवाल प्राप्त झाला. यात तिला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या दोघांनीही कोविशील्डचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती आहे.
ओमायक्रॉन संशयित आणखी १८ रुग्ण
मेयोच्या प्रयोगशाळेत होत असलेल्या ओमायक्रॉनचा प्राथमिक चाचणी ‘एस जीन’ नसलेल्या रुग्णांना ओमायक्रॉन संशयित म्हणून पाहिले जात आहे. आतापर्यंत २० रुग्णांच्या नमुन्यात हा ‘जीन’ आढळून आलेला नाही. यातील दोघांचे नमुने जनुकीय चाचणीत पॉझिटिव्ह आले. यामुळे उर्वरीत १८ रुग्णांच्या जुनकीय चाचण्यानचा अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील ८ तर, ग्रामीण भागातील २ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात आज २,४५१ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या २,२६९ चाचण्यांमधून ८ तर ग्रामीणमध्ये झालेल्या १८२ चाचण्यांमधून २ रुग्ण पॉझिटिव्ह आले. उर्वरीत २ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १०९ झाली आहे. यात शहरातील ९१, ग्रामीणमधील १२ तर जिल्हाबाहेरील ६ रुग्ण आहेत.