नागपूर : कोरोनाचे गंभीर संकट तूर्तास तरी टळले आहे. तिसऱ्यांदा कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली. रविवारी २२ रुग्ण आढळून आले. यात शहरातील १७ तर ग्रामीण भागातील ५ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७६,९८४ झाली असून मृतांची संख्या ९०२५वर स्थिरावली आहे. आज कोरोनाचे ६९ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाचा दर ९८.२ टक्क्यांवर पोहचला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणेला हैराण केले होते. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले होते. मात्रा आता दिवसागणिक बाधित व मृतांची संख्या कमी होत आहे. नागपूर जिल्ह्यात या वर्षात पहिल्यांदाच २० जून रोजी शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर २५ जून व २६ जून रोजी झाली. रविवारी ८५३८ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत ०.२५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हिटीचा हाच दर शहरात ०.२३ टक्के तर ग्रामीणमध्ये ०.३५ टक्के आहे. आतापर्यंत शहरातील ३,२७,२३६ तर ग्रामीणमधील १,४०,२९७ असे एकूण ४,६७,५३३ रुग्ण बरे झाले आहेत.
-कोरोनाचे ४२६ अॅक्टिव्ह रुग्ण
नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्याचा शेवटच्या आठवड्यात ७७ हजारांवर कोरोनाचा अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या होती. दोन महिन्याचा कालावधीत ही संख्या आता ५००च्या खाली आली. रविवारी ४२६ अॅक्टिव्ह रुग्ण होते. यात शहरातील ३७९ तर ग्रामीण भागातील ४७ रुग्ण होते. यातील १६० रुग्ण विविध रुग्णालयात तर २६६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
:: कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ८५३८
शहर : १७ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ५ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७६,९८४
ए. सक्रिय रुग्ण : ४२६
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६७,५३३
ए. मृत्यू : ९०२५